जेव्हा साक्षात 'प्रभू श्रीरामा'चा फोन येतो....

Updated: Aug 10, 2015, 10:50 PM IST


 

सुनील घुमे, झी मीडिया, मुंबई : स्वतःला देवीचा अवतार समजणा-या 'राधे माँ'च्या लीला सध्या आपण पाहतोय... पण भक्तीचा आणि श्रद्धेचा बाजार मांडणा-या त्या एकट्याच आहेत का? मुंबईसारख्या मायानगरीत अनेक वर्षांपासून हे मोहजाल कसं पसरलंय, त्याचाच हा एक जिवंत अनुभव...

.............

"जय श्रीराम... हॅलो सुनीलजी, कैसे है आप..?"

सकाळीच फोनने झोपमोड झाली.. लँडलाइनवरून आला होता फोन... नंबर ओळखीचा नव्हता. पण आवाज नक्कीच ओळखीचा होता.

एकदम धीरगंभीर, पण प्रसन्न आणि मंजूळ आवाज...

साक्षात 'प्रभू श्रीराम' पलीकडून फोनवर बोलत होते...

आता तुम्ही म्हणाल, ही काय भानगड आहे..? सांगतो... पण त्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल.

सध्या गाजत असलेल्या राधे माँच्या निमित्तानं ती जुनी आठवण ताजी झाली...

...................

साधारण दहा वर्षांपूर्वीचा म्हणजे 2005 किंवा 2006 सालचा हा अनुभव... दादरला प्रीतम हॉटेलजवळ आम्ही जमलो... पाच-सहा पत्रकार. एका हिंदी वृत्तपत्रात मुंबई ब्युरो चीफ असलेल्या ज्येष्ठ पत्रकाराने आग्रह केला म्हणून सगळे आले होते... आम्हाला न्यायला एक मोठी आलिशान एसी गाडी तिथं आली. तिथून आम्ही सगळे अंधेरीला निघालो...

त्यादिवशी एक सिद्धहस्त साधुपुरूष, कित्येक वर्षं हिमालयात तपश्चर्या केलेले हे गुरूमहाशय मुंबईत दोन-तीन दिवसांच्या मुक्कामाला आले होते. सत्संग की काय, म्हणतात ते होते. अशा सत्संग, प्रवचन वगैरे कार्यक्रमांना हजर राहण्याचं माझं वय निश्चितच नव्हतं. पण त्या ज्येष्ठ पत्रकाराचा आग्रह मोडता आला नव्हता...

आमची गाडी एका बंगल्याजवळ थांबली... त्या पॉश वस्तीत एका रांगेत सगळे बंगले होते. बंगला फुलांच्या माळांनी सजवला होता... बंगल्याबाहेर ही गर्दी उसळलेली... त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. बहुसंख्य महिला आणि पुरूष मंडळींच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे... चांगल्या खात्यापित्या, सधन घरातली ही मंडळी दिसत होती. त्यातही गुजराथी आणि उत्तर भारतीयांचा भरणा जास्त असावा... मात्र एवढी गर्दी असूनही कुठेही धसमुसळेपणा नव्हता. सगळे शांतपणे रांगेत उभे होते. आम्हाला व्हीआयपी ट्रिटमेंट असल्यानं थेट आतमध्ये शिरलो... बंगल्याच्या हॉलमध्ये तीन-चार यज्ञकुंडं दिसली. त्याभोवती पूजाअर्चा सुरू होत्या. तिथून जिन्यावरून आम्ही पहिल्या मजल्यावर गेलो. तिथल्या एका रूममध्ये आम्हाला बसवण्यात आलं.

वातावरणात चंदनाचा वास पसरलेला होता. फुलांच्या माळा, गोंडे, केळी, फळं, विविधरंगी फुलं, गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेली ताटं... आमची ओळख एका सद्गृहस्थांशी करून देण्यात आली. बहुतेक ज्या बंगल्यात हा सत्संगरूपी कार्यक्रम सुरू होता, तो त्यांचा असावा. मध्यम वयाचे हे गृहस्थ सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. त्यांनी कुणाला तरी हाक मारली, कानात काहीतरी सांगितलं. अवघ्या पाचच मिनिटात स्वादिष्ट मिठाई, बर्फी, सफरचंद, ऑरेंज ज्युस आमच्या दिमतीला हजर झाला. अगदी आग्रह करून करून त्यांनी खाऊ घातलं. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या एक सहका-याच्या कानात काहीतरी सांगितलं. तो निघून गेला.

'स्वामीजी, ध्यान कर रहे है... जैसे ही बुलावा आएगा, मै आपको बतादूँगा...' असं सांगून ते निघून गेले.

आता रूममध्ये आम्ही पाच-सहा पत्रकारच होतो... समोरच्या भिंतीवर ओम आणि त्यावर एक मंत्र अशी मोठी तसबीर लावलेली होती. आणखी किती काळ वाट बघायची, असे त्रासिक भाव चेह-यावर होते. आमची ही अस्वस्थता लपत नव्हती. पाचेक मिनिटं झाली असतील तोच आम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला...


रामाच्या भूमिकेत अरूण गोविल

साक्षात भगवान श्रीरामांचं दर्शन आम्हाला घडलं... आमच्या समोर प्रभू श्रीराम म्हणजे रामायणफेम अरूण गोविल उभे होते. अरूण गोविल यांची जादू एकेकाळी अवघ्या भारतवर्षावर पसरली होती. आमच्या लहानपणी टीव्हीला फुलांचा हार घालून, त्यांची 'रामायण' ही सिरीयल बघितली जायची. रामाला तर कुणी पाहिलं नव्हतं, पण यापेक्षा ते वेगळे दिसत नसतील, एवढं नक्की... ते आपल्यासमोर उभे आहेत, आपल्याशी बोलतायत, यावर काही क्षण विश्वासच बसेना...

अरूण गोविल आले आणि त्या रूममधलं वातावरण बदलून गेलं. त्यांनी आमच्याशी गप्पा सुरू केल्या. आता ते सिरीयलमध्ये, सिनेमात कामं करत नव्हते. मग ते काय करतात? त्यांनीच सांगितलं की, सध्या ते स्वामीजींच्या सेवेत रूजू आहेत. म्हणजे ज्या 'प्रभू श्रीरामा'कडे अख्खा देश भक्तीभावानं पाहायचा, ते अरूण गोविल स्वामींजींच्या सेवेत रूजू होते. याचा अर्थ हे स्वामीजी कुणीतरी बडी असामी असणार, याची मनोमन खात्री पटली... पुढचा अर्धा-पाऊण तास ते आमच्याशी बोलत होते. आता अजिबातच कंटाळा येत नव्हता. उलट व्हिजिट सार्थकी लागल्याची भावना मनात निर्माण झाली.

थोड्या वेळानं पुन्हा ते आधीचे सद्गृहस्थ रूममध्ये आले. स्वामीजींचा बुलावा घेऊन... आम्ही एकापाठोपाठ एक आणखी एक संगमरवरी जिना चढून दुस-या मजल्यावर गेलो. तिथं बाहेर दोन-तीन माणसं उभी होती. आम्ही गेल्यावर ती थोडी सावध झाली. ते सद्गृहस्थ, त्यांच्यामागे अरूण गोविल आणि त्यामागे आम्ही... सगळे त्या स्वामीजींच्या एसी मठीत दाखल झालो... पांढरी दाढी, बुजूर्ग म्हणता येईल एवढं वय... स्वामीजींनी हातानंच बसण्याचा इशारा केला. ते सद्गृहस्थ आणि अरूण गोविल स्वामीजींच्या पाया पडले. आमच्यापैकी एखाद-दोघांनीही वाकून नमस्कार केला. मी आपल्या जागेवरूनच हात जोडले. स्वामीजींनी आमची ओळख करून घेतली.

'मीडिया के लोग...' स्वामीजींच्या चेह-यावर तेज आलं...

त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या हातात एकेक फूल दिलं... डोळे बंद करायला सांगितले... तुमच्या मनातली एखादी अपूर्ण इच्छा आहे का? असेल तर ती इच्छा मनातल्या मनात बोलायला सांगितली. मग आमच्या हातात गुलाबाच्या पाकळ्या दिल्या आणि एक मंत्र म्हणायला सांगितला. स्वामीजी मंत्र म्हणत होते आणि आम्ही मागून तो बोलत होतो... बहुधा मघाशी भिंतीवर लिहिलेला तोच मंत्र असावा... मंत्र म्हटल्यावर हातातली फुलं समोरच्या शिवलिंगावर सोडायला सांगितली. तुमच्या इच्छा फलद्रूप होतील, असा आशीर्वाद स्वामीजींनी दिला. त्या सद्गृहस्थांनी पुन्हा स्वामीजींच्या पायावर डोकं टेकलं. अरूण गोविलांनी त्याची पुनरावृत्ती केली. आणि आम्ही त्या मठीबाहेर पडलो...

15 ते 20 मिनिटे हे सोपस्कार सुरू होते... माझा काही या गोष्टींवर विश्वास नव्हता. ते सद्गृहस्थ आणि अरूण गोविल स्वतः आम्हाला सोडायला खाली आले... त्या स्वामीजींना भेटून मला काहीच वाटलं नाही... पण अरूण गोविल म्हणजे साक्षात प्रभू श्रीरामांना भेटल्याचं मोठं समाधान घेऊन मी तिथून निघालो... आम्ही गाडीत बसत असतानाच त्या सद्गृहस्थांनी स्वामीजींचं एक पुस्तक हातात दिलं. त्यात स्वामीजींच्या विविध मीडियात प्रसिद्ध झालेल्या मुलाखती आणि लेख होते. 'आपके पेपर में कुछ राइटप आएगा, तो अच्छा होगा...' असं त्यांनी सांगितलं. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता. स्वामीजींबद्दल आम्ही गुडी गुडी लिहावं, अशी त्यांची अपेक्षा होती. आम्ही निघालो...


अरूण गोविल

अर्थातच या भाकड गोष्टींवर माझा विश्वास नसल्यानं मी काहीच लिहिलं नाही. आणि इतरांनी लिहिलं की नाही, हे देखील मी विचारलं नाही... पण दोन दिवसांनी सकाळी झोपेत असतानाच फोन आला...

"जय श्रीराम... हॅलो सुनीलजी, कैसे है आप..?"

आवाज अर्थातच ओळखीचा होता... कसं विसरणार होतो, तो आवाज? कारण पलीकडे साक्षात प्रभू श्रीराम म्हणजे अरूण गोविल होते...

"जय श्रीराम... मै ठीक हूँ..." मी उत्तर दिलं.

"स्वामीजी के बारे में आपने कुछ अपने पेपर में लिखा है?" गोविलांनी थेट विषयाला हात घातला.

आता काय सांगायचं? मी तर काहीच लिहिलं नव्हतं... म्हणजे तसं थेट सांगता आलं असतं. पण फोनवर पलीकडे साक्षात प्रभू श्रीराम होते. स्वामीजींबद्दल नाही, पण अरूण गोविल यांच्याबद्दल मात्र माझ्या मनात अपार श्रद्धा होती. त्यांना कसं दुखवायचं? असा विचार मनात आला...

"नही... अभी तक नही लिखा..." - मी

"ठीक है... जब छपेगा तो मुझे कृपया बता दीजिएगा... मेरा नंबर आपके पास है ना..?" - इति अरूण गोविल

मी हो म्हटलं आणि फोन ठेवला...

...........

दोन दिवसांनी पुन्हा फोन आला...

"जय श्रीराम... सुनीलजी, मै अरूण गोविल बोल रहा हूँ"

आता मात्र मी माझा नाइलाज होता. मनाचा हिय्या करून मी त्यांना सांगितलं की, माझा या गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळं काही लिहिण्याचा प्रश्नच येत नाही...

कदाचित माझं हे सत्यवचन त्यांना दुखावणारं ठरलं असेल... पण त्यांनी तसं अजिबातच बोलून दाखवलं नाही...

"जैसे आपकी इच्छा... लेकिन आप कुछ लिखते तो अच्छा होता.." असं सांगून अरूणजींनी फोन ठेवला...

...........

अरूण गोविल त्या स्वामीजींचं एवढं मार्केटिंग का करतायत, हे कोडं मला सतावत होतं.

ज्या माणसाच्या पायावर अख्खा देश भगवान श्रीराम म्हणून डोकं ठेवत होता, तोच माणूस कुणा स्वामीजींसाठी आपली बुद्धी आणि वाणी खर्च करत होता?

खूप वाईट वाटलं... मनापासून वाईट वाटलं...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.