मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले.
ही बातमी आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात बर्फात दबून शहीद झालेल्या, लान्स नायक शहीद हणमंतप्पांची आठवण झाली, आणि 'आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?', असा प्रश्न पडला.
असं वाटण्याचं कारणही तसंच आहे, हल्ला झाल्याची बातमी येते, नंतर शहीद झालेल्या जवानांची नावं येतात, आणि धक्का बसतो, कारण ९९ टक्के जवान हे शेतकऱ्यांची मुलं असतात.
कर्नाटकमधील बेट्टादूर-धारवाडचा लान्स नायक शहीद हणमंतप्पा देखील शेतकऱ्याचाच होता. शहीद हणमंतप्पाला २ वर्षाची चिमुकली आहे.
बाप शेती सांभाळतो, शेतीत शून्य मोबदला येत असला, तरी पिकवून अनेकांची पोटं भऱतो, दुसऱ्याचं पोट भरता-भरता, आपल्या अपत्यांची पोट भरणं त्याला होत नाही, म्हणून लष्करासारखी खडतरं नोकरीत मुलाला पाठवतो, मुलगा सिमेवर नोकरी करतो म्हणून देशाभिमान देखील राखतो.
मुलगाही सिमेवर सेवा करताना, दोन पैसे मदतीसाठी घरी पाठवतो, कारण बाप कसे दिवस काढतो, पैसा म्हणजे काय याची किंमत त्याला कळलेली असते.
मात्र सिमेवरून मदत करणारा शेतकऱ्याचा हणमंतप्पाच गेला, तर त्या कष्ट करणाऱ्या पण परिस्थितीपुढे लाचार असणाऱ्या म्हाताऱ्या-आईवडिलांचा मदत कोण करणार आणि त्यांच्या दोन-दोन वर्षाच्या मुलांचं जीवन कोण घडवणार?
म्हणून हल्ला झाल्यानंतर हा प्रश्न हादरवून टाकतो, 'आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?'