‘झी २४ तास’च्या ह्या नवीन वेबसाइट बद्दल, खूप खूप अभिनंदन. उतरोत्तर अशीच भरभराट होवो अशी अशा बाळगतो.एखादा फोटो खूप काही बोलून जातो... तसचं एका फोटोने मला खूप काही मिळवून दिलं, आज ह्याच फोटोग्राफीबद्दल लिहायला मिळतेय याचा आनंद काहीच औरच..... ऑगस्ट २००८ महिना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरला. फोटोग्राफी जगतातले ऋषी म्हणावे असे गौतम राजाध्यक्ष, ह्यांनी मला एका सोशल नेटवर्किंग साइटवर मेसेज केला, त्याआधी मी केलेल्या निव्वळ हौशी फोटोग्राफीला त्यांनी दिलेल्या मेसेजने मला एका नव्या वळणावर आणून ठेवलं. फोटोग्राफीकडे बघायचा माझा दृष्टिकोन चटकन बदलला .
त्यानी केलेला तो मेसेज एका दिव्याच्या फोटोवरील होता. स्पर्धात्मक क्रिकेट खेळता खेळता बी.कॉम पर्यंतचा अभ्यास, मग ऍनिमेशन क्लास त्यानंतर ऑईल पेंटिंग अश्या कामधंद्यात असताना, फोटोग्राफी ह्या शब्दावर गाडी आली आणि आज ती गाडी अगदी योग्य मार्गावर धावते आहे....... माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात अवघड, पण सोपा, सगळ्यात धोकादायक पण तितकाच सुदंर, सगळ्यात टेंन्शन देणारा पण रिलॅक्स्ड शूट म्हणजे गौतम राजाध्यक्ष ह्यांचा …
सराचं शूट एका मासिकासाठी केलं होतं, ज्यांनी मला शिकवलं त्यांचचं फोटोशूट करताना, मी पुरता अवघडलेलो ? त्यांनी मायेचा हात फिरवला आणि त्यांच्या असिस्टेंट मंगेशला त्यांची शाल आणायला सांगितली. हा मंगेश म्हणजे “पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश” तसा हा सरांचा आवडता असिस्टेंट, सरांची गेली 17 वर्ष अविरतपणे सेवा करतोय, त्यांची काळजी घेतोय. त्यांनी शाल आणल्यावर माझं शूट सुरू झालं आणि 3-4 फोटो क्लिक केल्यानंतर सर म्हणाले “ बस्स आता, मिळालेत तुला पिक्चर्स, आणि मी कॅमेरामध्ये बघितलं तर खरंच मला चांगले फोटो मिळाले होते. त्याचं फोटोशूट हा माझ्यासाठी आयुष्यभर पुरून उरणारा असा अविस्मरणीय क्षण.
कुणास ठाऊक पण मला फोटोग्राफीची पूर्वीपासूनच खूप आवड होती आणि आहे देखील. ही फोटोग्राफीची आवड लागण्याची दोन कारणं, एक तर ट्रेकिंग आणि माझी मानलेली बहीण कृतिका भोसले. हिमाचलच्या दऱ्यांमध्ये ट्रेकिंग करताना माझ्याकडे चांगला कॅमेरा नव्हता पण कृतिकाकडे होता, त्या कॅमेरातून मी काही फोटो काढले. ते फोटो पाहून कृतिका चक्क वॉव म्हणाली. मग तर मी ठरवलंच की आता नवा कॅमेरा घ्यायचाच..
त्या ट्रेक नंतर एक कॅमेरा घेतला डीएसएलआर कॅनन 400डी. पण वापरायचा कसा हेच माहीत नव्हंत (आताही माहीत नाही.. असो.) त्यानंतर IPA मध्ये बेसिक फोटोग्राफी करण्यासाठी डेरेदाखल झालो. तसा कोर्स मी बऱ्यापैकी एन्जॉय केला, पुढे त्याच क्लासच्या काही मुलांसोबत फोटोग्राफीचे काही नवनवे प्रयोग आम्ही करीत असे.. अनेक खटपटी करायचो.. तेव्हा असंच एका दिव्याचा एक फोटो माझ्याकडून क्लिक झाला आणि (एडिसनने शोध लावलेल्या) दिव्याचा फोटो मिळाला नंतर त्याच फोटोला श्री.गौतम राजाध्यक्ष सरांची दाद मिळाली, माझा हा फोटो एक ‘राइट क्लिक’ होता. पण गौतम सरांनी याची पोच पावतीच मला दिली ती अशी इट्स राइटली क्लिक्ड.. (It’s RIGHTLY CLICKED)….
मित्रांनो अश्या खूप साऱ्या आठवणी या कॅमेऱ्याच्या मागे दडल्या आहेत... तर पुन्हा नक्कीच भेटू झी 24 तासच्या ब्लॉगर्स पार्कमध्ये...माझा हा पार्कातला फेरफटका कसा वाटला हे मात्र नक्की कळवा... चला मग पुन्हा भेटूच तुर्तास SMILE PLEASE :)
शब्दांकन - रोहित गोळे