www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सैफ अली खानचा ‘बुलेट राजा’ आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. ‘बुलेट राजा’ या नावावरुनच हा सिनेमा कसा असेल हे कळतं. चित्रपट बुलेट सारखाच पळतो. तर राजा म्हणजे आपल्या मनासारखा जगणारा व्यक्ती... जो कोणत्याच बाबतीत तडजोड करत नाही. उत्तरप्रदेशातली राजकीय आणि गुन्हेगारी याभोवती हा सिनेमा फिरतो.. याच विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत पण बुलेट राजा आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय.
आज काल प्रत्येक चित्रपटात आवश्यक असलेला संपूर्ण मसाला दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या ‘बुलेट राजा’मध्ये दिसतो. अॅक्शन, रोमांस, गाणी, विनोद सर्वांगानं भरलेला हा सिनेमा एक कंपलीट पॅकेज आहे. दिग्दर्शकानं तसा प्रयत्नही केलाय.
काय आहे सिनेमाची कथा?
‘बुलेट राजा’ची कथा ही दोन तरुणांची आहे. राजा मिश्रा (सैफ अली खान) आणि रुद्र (जिम्मी शेरगिल) यांची... या दोघांच्या आयुष्यातल्या काही घटना त्यांना गुन्हेगारीच्या जगात घेऊन जातात आणइ तिथूनच गोळीबार, हत्या, बदला, डबल क्रॉसच्या घटनांना सुरुवात होते. रामबाबू शुक्ला (राज बब्बर) सारखा राजकारणी, त्याला असणाऱ्या बजाज(गुलशन ग्रोवर)सारख्या माणसांचं आर्थिक पाठबळ यामुळं एक वेगळा माहौल बनलेला आहे. पण सिस्टिमच्या विरोधात त्याची पहिली ठिणगी पडते ती राजा-रूद्र एकत्र असताना बजाजनं केलेल्या अपमानाच्यावेळी... मग तिथं झालेला अपमान, त्यानंतर अपहरणनाट्य अन् त्यासगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देण्यासाठीचा सूड उगवण्याचा घेतलेला निर्णय.... सामान्य माणसामधला माणूसपण जागा होतं त्यावेळी हिंसाचाराचा तो मार्ग पत्करतो. मग सिनेमात राजाच्या आयुष्यात येते ती सोनाक्षी सिन्हा आणि त्यानंतर एक वेगळा प्रवास सुरू होतो... यानंतरची घटना दिग्दर्शक तिग्मांशूनं खूप चांगल्या पद्धतीनं जोडल्या आहेत.
इतर कलाकार आणि दिग्दर्शन, संगीत
दिग्दर्शक तिग्मांशू यांचं दिग्दर्शन खूप कसलेल्या पद्धतीनं केलंय. ‘तमंचे पर डिस्को’ आणि ‘डोंट टच माय बॉडी’ ही गाणीही प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात. जिम्मी शेरगिलनं आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं साकारलीय. सिनेमात सोनाक्षी, सैफ, आणि जिम्मी शेरगिलसह चंकी पांडे, रवि किशन, विद्युत जामवाल आणि गुलशन ग्रोवर अशी दिग्गज स्टारकास्ट आहे. चंकी पांडे आणि गुलशन ग्रोवर यांनी आपल्या भूमिकेला खूप चांगल्या पद्धतीनं न्याय दिलाय.
उत्तरप्रदेशातली परिस्थिती खूपच मनोरंजक आणि उत्तम पद्धतीनं पडद्यावर साकारण्यात आलीय. सिनेमातले अनेक डायलॉग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतात. खूप प्रमाणात गोळीबार सिनेमात पाहायला मिळतो. मात्र त्याचबरोबर योग्य त्या टायमिंगमध्ये विनोदही सर्वांची दाद मिळवून जातो.
एकूणच अॅक्शन, रोमांस, विनोद यासारख्या मसाल्यानं भरपूर असलेला हा सिनेमा एकदा तरी पाहायला हरकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.