www.24taas.com, मुंबई
अभिनेता सलमान खान याला अपघाताबाबत ‘पूर्वकल्पना’ असतानाही त्यानं बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्यानं झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, अशा शब्दांत न्यायालयानं त्याच्यावर ताशेरे ओढलेत. एव्हढंच नाही तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता, केवळ ‘हिट अॅन्ड रन’मध्ये झालेल्या हत्येचा नाही असंही न्यायालयानं म्हटलंय.
बांद्रातील ‘हिट अँड रन’ प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर कोर्टाने जोरदार ताशेरे ओढलेत. सलमान खानला अशा बेदरकार ड्रायव्हिंगमुळे कोणाचाही जीव जावू शकतो याची पूर्ण कल्पना होती. सलमानच्या बॉडीगार्डने त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांची कल्पना दिली होती, पण त्यानं कुणाचंही न ऐकता गाडी वेगात चालवणं सुरुच ठेवलं, असं कोर्टाने आपल्या सुनावणीत म्हटलंय. ‘पुढे वळणाचा रस्ता असल्याने ताशी ९० ते १०० किलोमीटरच्या वेगाने गाडी चालवू नये, यामुळे अपघात होऊ शकतो’ असं बॉडीगार्डने सलमानला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा सल्ला सलमानने धुडकावला आणि त्यानंतर प्रत्यक्षात झालेल्या अपघातात एकाला आपला प्राण गमवावा लागला होता.
सलमानवर सध्या कलम ३०४ अ ऐवजी ३०४ (२) अंतर्गत खटला चालणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास सलमानला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. मात्र, बांद्रा कोर्टाला या कलमांतर्गत सुनावणी करण्याचा अधिकार नसल्याने हा खटला मुंबई सत्र न्यायालयात चालवण्यात येणार आहे. सलमान खानला आता ११ मार्च रोजी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.
सप्टेंबर २००२मध्ये बांद्रातील एका फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना सलमानने आपल्या लँड क्रूझर गाडीने चिरडलं आणि यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला होता.