www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.
राज्यातील व्यसनाधिनता कमी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असून त्यास महानायक अमिताभ बच्चन यांचीही साथ मिळणार आहे. या अभियानासाठी बनविण्यात येणाऱ्या जाहिरातींद्वारं अमिताभ बच्चन व्यसनमुक्तीचा संदेश देणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी रविवारी नाशिकमध्ये दिली.
अमिताभ यांचा समावेश असलेल्या जवळपास ९० सेकंदांच्या या जाहिराती पुढील दीड ते दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारं प्रदर्शित होतील. मुख्य म्हणजे अमिताभ यांनी या जाहिरातींसाठी कुठलंही मानधन घेतलेलं नाही, असंही मोघे यांनी सांगितलं. या जाहिरातींद्वारं अमिताभ मद्य, गुटखा, तंबाखू तसंच इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देतांना दिसतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.