www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाइल, इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्ट फोन हे आजकालच्या युवा पिढीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा
भाग बनले आहेत. नेट सर्फींग, सोशल नेटवर्कींग साइट्सचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एक चांगली तर एक वाईट. गुगल च्या साहाय्याने कोणत्याही विषयाची माहिती आपल्याला मिळते. तसंच याचा साइड इफेक्ट म्हणजे वाढत चाललेले सायबर क्राईम. हॅकींग हे याचं एक उदाहरण.
युवा पिढीच्या याचं टॉपिकवर आधरीत सौरभ वर्माचा ‘मिकी वायरस’ हा हलका-फुलका कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
काय आहे सिनेमाची कथा?
सिनेमा सुरू होतो तो परदेशी हॅकर्सच्या खुनापासून. परदेशी हॅकर्सच्या खुनांच्या साखळीने अस्वस्थ झालेले दिल्ली पोलीस त्यामागचं कारण आणि खुन्याला शोधत असतात. पण हाती काहीचं लागत नाही. एसीपी सिद्धान्त चौहान (मनीष चौधरी) हॅकर्सच्या खुन्याला शोधण्यासाठी एका हॅकर्सची गरज असल्याचं सांगतात. त्यांच्या नजरेत येतो मिकी अरोरा (मनीष पॉल). सगळ्यांसमोर पण कोणालाही काही न कळता एखादी साइट तो सहजरित्या हॅक करत असतो. याचा पुरेपुर उपयोग करण्याचा एसीपी ठरवतो. मिकीला हरप्रकारे समजावून सांगितल्यानंतर तो या कामासाठी तयार होतो. त्यातच त्याची भेट कामयानी जॉर्जशी (एली आव्राम) हिच्याशी होते. एकीकडे यांची लव्ह स्टोरी रंगात येते तर दुसरीकडे एसीपी मिकीच्या डोक्यावर नाचत असतो. एकदा कामयानी ऑफिसच्या एका कामात चूक करते. ती चूक सुधारण्यासाठी मिकी तिला मदत करतो. पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मोठ्या संकटाला त्याला सामोर जावं लागतं. या संकटातून तो स्वत:ला सोडवण्याचा कसा प्रयत्न करतो ??? याची कथा म्हणजे ‘मिकी वायरस’
कलाकारांचा अभिनय
मनीष पॉल आणि एली आव्राम चा हा पहिलाच सिनेमा आहे. पहिला सिनेमा असूनही मनीष पॉलने अभिनय उत्तम केलाय. त्याच्या अभिनयातून आत्मविश्वास दिसून येतो. एली आव्राम दिसलीय छान मात्र अभिनयात थोडी मागे पडते. वरुण बडोला ने ‘भल्ला’ ही भूमिका उत्तम साकारली आहे. मनीष चौधरी ने एसीपीची भूमिका छान निभावली आहे. तसेच मिकीची गँग- चटनी (पूजा गुप्ता), फ्लॉपी (राघव कक्कर), पँचो (विकेश कुमार) हे कलाकाराही बाजी मारून गेले आहेत.
का पाहावा हा सिनेमा?
सिनेमात मनिषचे टीशर्ट बघण्यासारखी आहेत. टेक्नोलॉजीशी संबधीत वाक्य आणि चित्र असलेली टीशर्ट सिनेमात अनेकदा लक्ष वेधून घेतात. संगीतकारही नवा असला तरी त्याने बाजी मारून नेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची गाणी असल्यामुळे श्रवणीय आहेत. सिनेमामध्ये रोमान्स, विनोद, रहस्य, अस सगळ काही असल्याने गाण्यांमध्येही ते वेगळेपण टिकवून ठेवलंय. पटकथा उत्तम जमली आहे. सायबर क्राइम या गंभीर विषायाला रहस्याची जोड आहे. पुढे काय होणार याची उत्सुकता वाढत जाते. प्रसंगाची साखळी घट्ट असल्याने लिंक कुठेही तुटत नाही.
या सिनेमात काय नाही?
पटकथेला वेग असला तरी पूर्वार्ध थोडा मंद आहे. मिकीला कामासाठी तयार करावा लागणारा वेळ खूप वाटतो. तिकडे पटकथा सैल वाटते. मिकीला घरून येणारा फोन ही अनावश्यक वाटतो. असे विनोद आणि काही प्रसंग खटकणारे आहेत. पण सायबर क्राइमसारखा गंभीर विषय विनोदी आणि रहस्यमय दाखवून सिनेमाने बाजी मारलीय. एकदा बघायला हरकत नाही.
मिकी वायरस
निर्देशक - सौरभ वर्मा
निर्माता - अरुण रंगाचारी
विवेक रंगाचारी
कथा - सौरभ वर्मा, गौरव वर्मा
कलाकार – मनीष पॉल
एली आव्राम
मनिष चौधरी
वरुण बडोला
पुजा गुप्ता
नितेश पान्डे
संगीतकार - हनिफ शेख
छायाकार - अंशुमन महाले
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.