फिल्म रिव्ह्यू : `क्वीन`चा शानदार परफॉर्मन्स

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2014, 09:16 AM IST

सिनेमा : क्वीन
दिग्दर्शक - विकास बहल
निर्माता - अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी
कलाकार - कंगना रानौत, राजकुमार राव, लिजा हेडन
संगीत - अमित त्रिवेदी
वेळ - १४६ मिनिटे

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय. श्रीदेवीच्या नुकत्याच आलेल्या इंग्लिश-विंग्लिश या सिनेमाची आठवणही अनेकदा या सिनेमा पाहत असताना होते. पण, शेवटपर्यंत तुमच्या आठवणीत राहते ती `राणी`च्या भूमिकेतली कंगना रानौत...
काय आहे सिनेमाचं कथानक...
दिल्लीच्या राजौरी गार्डनच्या रानीची (कंगना रानौत)ची ही कथा... दोन दिवसांवर रानीचं लग्न येऊन ठेपलंय... विजय (राजकुमार राव) सोबत तिचं लग्न होतंय... साहजिकच, रानी आपल्या स्वप्नांतच हरवलीय. फ्रान्स आणि अॅमस्टरडॅममध्ये हनीमून पॅकेजची बुकींगही तिनं करून ठेवलीय. पण, नेमकं याचवेळी विजय तिला आपण तिच्याशी लग्न करू शकणार नसल्याचं सांगतो... आणि रानीला लागतो एक जोरदार धक्का...
या धक्क्यातून सावरण्यासाठी रानी एकटीच हनीमूनला फ्रान्स आणि अॅम्स्टरडॅमला एकटीच निघते... या निर्णयासाठी तिचं कुटुंबीयही तिला साथ देतं... आणि पुढचा सगळा सिनेमा म्हणजे रानीचा पुढचा प्रवास... फ्रान्समध्ये सांस्कृतिक धक्के, वेगळी भाषा, वेगळे लोक आणि अनेक अडचणींचा सामना करणारी रानी तिचा आत्मविश्वास परत मिळवते... पण, रानीचा हा प्रवास प्रेक्षकांसाठी अत्यंत मनोरंजक ठरतो.
एक साधी सरळ कथा मोठ्या मनोरंजक पद्धतीनं सादर करण्यात आलीय. या कथेतील नायिकेला योग्य, अयोग्य, परंपरा, असली, नकली, पागलपणती अशा कोणत्याही चौकटीमध्ये अडकवलं गेलं नाहीए... त्यामुळे ती आपलीशी होऊन जाते.
अभिनय
रानीच्या भूमिकेत कंगनानं धम्माल उडवून दिलीय. कॉमेडी सीन्स असतील किंवा सिनेमाचा क्लायमॅक्स असेल कंगनानं आपली भूमिकेचा भार उत्तमरित्या पेलल्याचं स्पष्ट दिसून येतं. तिच्यासोबत तिची बॉडी लँग्वेजही उत्साह, हिंमत, स्वातंत्र्याचा प्रवास करते. या प्रवासात तिची मैत्रिण तिची सोबत करते... या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसते लीजा हेडन... राजकुमार रावला तसा भूमिकेत जास्त भाव मिळाला नाही, परंतु छोट्या भूमिकेतही त्यानं चांगला अभिनय केलेला जाणवतो.

संगीत
अमित त्रिवेदीचं म्युझिक प्रेक्षकांना फ्रेश वाटतं... सिनेमातही या संगीताचा वापर आकर्षक पद्धतीनं करण्यात आलाय. मुख्य म्हणजे `लंदन ठुमकदा` आणि `किनारे मिल गए` प्रेक्षकांना मोहवून टाकतात.
दिग्दर्शन
दिग्दर्शक विकासत बहल यांनी एक महिला प्रधान सिनेमा मोठ्या पडद्यावर आणलाय जो प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करतो... प्रेमभंग झाल्यापासून ते आपल्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास परत मिळवण्यापर्यंतचा रानीचा प्रवास प्रेक्षकांनाही वावतो. यामध्ये कोणताही उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अत्यंत चोखंदळ दिग्दर्शनामुळे सिनेमात हिरोची कमतरता कुठेही जाणवत नाही.
कंगनाचा हा सिनेमा चुकवू नये, असाच आहे... त्यामुळे या आठवड्यात या सिनेमाचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.