अजय की शाहरुख... कुणी मारली बाजी?

बॉक्स ऑफीसवरही दिवाळी धमाका झाला तो शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमांच्या रिलीजमुळे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 14, 2012, 09:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
बॉक्स ऑफीसवरही दिवाळी धमाका झाला तो शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमांच्या रिलीजमुळे... मात्र, रिलीज आधीही या दोघांमध्ये दिसत असलेली टशन रिलीज नंतरही सुरू आहे आणि त्याचं कारण ठरतंय, ते या दोन्ही सिनेमांचं बॉक्स ऑफीस कलेक्शन...
दिवाळीच्या मुहूर्तावर सन ऑफ सरदार आणि जब तक है जान या फिल्मस दाखल झाल्या आणि बॉक्स ऑफीसनंही चाहत्यांना एक अनोखी दिवाळी भेट दिली. ‘जब तक है जान’ हा सिनेमा रोमॅण्टिक असल्यामुळे युवा पिढीला हा सिनेमा जास्त आवडतोय आणि म्हणूनच पहिल्या दिवशी या सिनेमाने जवळपास १५ कोटींचा बिझनेस केलाय. शिवाय अॅडव्हास बुकींग भरमसाट होतंच आहे. तर ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा संपूर्ण कुटुंब एन्जॉय करतंय. पहिल्या दिवसाचं या सिनेमाचं कलेक्शन जवळपास १२ ते १३ कोटी झालंय. या दोन्ही सिनेमांच्या रिलीज आधी सुरू झालेली अजय विरुद्ध शाहरुख यांच्यातली टशन रिलीजनंतरही कायम आहे. शाहरुखच्या ‘जब तक है जान’ सिनेमाला पहिल्या दिवशी जवळपास अडीच हजार स्क्रीन मिळाल्यात तर अजयला दोन हजार... ‘जब तक है जान’ हा सिनेमा ३ तास १५ मिनिटांचा आहे तर ‘सन ऑफ सरदार’ फक्त सव्वा दोन तासांचा... त्यामुळे आता अजयला जास्त स्क्रीन अॅव्हेलेबल होत आहेत. परिणामी अजयच्या ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचं अॅडव्हास बुकींगही चांगलंच होतंय. जेव्हा आम्ही सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रीया जाणून घेतल्या तेव्हाही शाहरुखपेक्षा अजयच्या सिनेमाला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.
दोघांच्याही फिल्म रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात शाहरुख पेक्षा अजयचंच पारडं जास्त जड आहे. मात्र, बॉक्स ऑफीस कलेक्शनमध्ये अजयपेक्षा शाहरुखनेच बाजी मारली. मात्र, आता शाहरुख विरुद्ध अजयमध्ये टायगरही आलाय. कारण यापुढे टायगरचा अर्थात ‘एक था टायगर’ सिनेमाचा १०० कोटींचा रेकॉर्ड कोण मोडतंय? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय.