जिया खान फक्त अभिनेत्रीच नव्हती...

आज आत्महत्या करून जगाचा निरोप घेणारी जिया खान केवळ एक अभिनेत्री नव्हती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 4, 2013, 06:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज आत्महत्या करून जगाचा निरोप घेणारी जिया खान केवळ एक अभिनेत्री नव्हती. ती अत्यंत प्रतिभावंत व्यक्ती होती. तिला साहित्य, संगीत आणि कलाक्षेत्राबद्दल प्रचंड प्रेम होतं. २० फेब्रुवारी १९८८ साली न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली जिया खान लंडनच्या चेल्सीमध्ये वाढली. तिने लंडनमधील एमपीडब्ल्यूमधून इंग्रजी साहित्य आणि कला या विषयांचं शिक्षण घेतलं. मात्र इंग्रजी साहित्याबद्दल जियाचं प्रेम इतकं होतं, की ती १७ व्या वर्षी इंग्रजीतील महान नाटककार शेक्सपियरचा अभ्यास करण्यासाठी आणि अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेली.
जियाने राम गोपाल वर्माच्या ‘निःशब्द’ मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. ही फिल्म जिया खानच्या करियरमधील मैलाचा दगडच होती. कारण या सिनेमात तिने अमिताभ बच्चनसोबत काम केलं. बोल्ड जियाचं नाव एका रात्रीत गाजलं. तिला २००७ साली फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला. या सिनेमातील टेक लाइट हे गाणं तिने लिहिलं होतं, या गाण्याचं संगीतही तिने दिलं होतं. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन तिनेच केलं होतं आणि सिनेमात हे गाणं गायलंही तिनेच होतं. त्यामुळे तरुण वर्गात जिया लोकप्रिय झाली.
जिया खानला साल्सा, जॅझ, कत्थक, बॅले, रेगे आणि बेली डान्स यांसारखे नृत्यप्रकार अवगत होते. गजनी या दुसऱ्या सिनेमात तिला आमिर खानसोबत लहान भूमिका केली होती. यानंतर २०१० साली हाऊसफुल्ल या मल्टिस्टारर सिनेमात तिने अक्षय कुमारसोबत काम केलं होतं. मात्र तरीही तिला म्हणावं तितकी लोकप्रियता मिळाली नाही.
सिनेमांव्यतिरिक्त जिया मॉडेलिंग क्षेत्रातही नावाजली होती. ‘रँगलर’ जीन्सची ती पहिली मॉडेल होती. ताज ग्रुपचीही जिया खान ब्रँड अँबेसडर होती. याशिवाय तिने अनेक सामाजिक संस्थांसोबत काम केलं होतं. तीने पेटासोबत काम करत पशु पक्ष्यांची काळजी घेण्याचा संदेश दिला होता. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे पक्ष्यांना होणारी इजा टाळावी, यासाठी विशेष उपक्रमात तिने सहभाग घेतला. अनेक सामाजिक संस्थांसाठी तिने मदत गोळा केली होती. तिला नुकताच एक हॉलिवूड प्रोजेक्टही मिळाला होता.