‘मार्केट-२’मधून मनिषाचं पुनरागमन?

न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली मनिषा कोईराला लवकरच दिग्दर्शक जय प्रकाश यांच्या ‘मार्केट २’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. खुद्द जय प्रकाश यांनीच याबद्दल माहिती दिलीय.

Updated: Mar 30, 2013, 11:03 AM IST

www.24taas.com, मुंबई
न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेली मनिषा कोईराला लवकरच दिग्दर्शक जय प्रकाश यांच्या ‘मार्केट २’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. खुद्द जय प्रकाश यांनीच याबद्दल माहिती दिलीय.
गर्भाशयाच्या कॅन्सरनं त्रस्त असलेली मनिषा सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘केमोथेरिपी’च्या साहाय्यानं उपचार घेत आहे. पण, आपल्या आगामी सिनेमात मनिषा दिसणार असल्याचं जय प्रकाश यांनी म्हटलंय. ‘मनिषा माझी लकी चॅम्प आहे. तिनं माझा सिनेमा ‘मार्केट’मध्येही काम केलंय. मी याअगोदर ‘मार्केट २’च्या पटकथेवर मनिषासोबत चर्चाही केलीय. या सिनेमाची कथा तिला पसंतही पडली. ती न्यूयॉर्कवरून परत आल्यावर मी ही पटकथा पुन्हा तिच्यासमोर मांडणार आहे’ अशी माहिती जय प्रकाश यांनी दिलीय.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मार्केट’ या सिनेमात मनिषानं नवऱ्यानंच वेश्यालयात धाडलेल्या एका महिलेची भूमिका निभावलीय. ४२ वर्षीय मनिषा गेल्या डिसेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये उपाचारासाठी गेली होती. तिथे तिच्यावर केमोथेरिपी करण्यात आली होती. तिचा व्यवस्थापक सुब्रतो घोषने ती जुलैमध्ये परतणार असल्याचं सांगितलंय.

मनिषानं १९९१ साली आलेल्या ‘सौदागर’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यानंतर तिनं दिल से, मन, १९४२ - अ लव्ह स्टोरी आणि लज्जा यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं. ती शेवटचं पडद्यावर दिसली ते, राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये...