www.24taas.com, ठाणे
‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.
आपल्या परखड मतांबद्दल आणि ते तेवढ्याच स्पष्टतेने मांडण्याबद्दल नाना नेहमीच चर्चेत असतो. यावेळी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जीवनगौरव पुरस्काराबद्दल नानाला त्याचं मत विचारण्यात आलं. त्यावेळी नानानं आपल्या या पुरस्कार घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही चांगलंच फैलावर घेतलंय.
‘आजकाल कुणीही उठून जीवन गौरव पुरस्कार देतंय. एखाद्याच्या जीवनाचे मोल एक लाख... दोन लाख...पाच लाख कसे असू शकते... कलाकारांची किंमत ठरवणारे हे कोण? ज्यांच्याकडून हे पुरस्कार दिले जातात, ते सरळमार्गाने पैसे कमावतात का? असं म्हणत नानानं आपली चीड व्यक्त केलीय.
‘भारत सरकारनं `रत्न` ठरवलेली मंडळीसुद्धा हे पुरस्कार घेतात तेव्हा वाईट वाटतं, लहानपणापासून मी एवढं भोगलं, असं सांगत ही मंडळी पुरस्कार घेताना आपल्याच दुःखाचं भांडवल करतात... हा खरं तर मोठा गुन्हाच मानायला हवा. लोकांची अशी वक्तव्यं ऐकताना त्यांच्या मुस्कटात एक ठेवून द्यावीशी वाटते’ असं म्हणताना नानानं हे पुरस्कार स्वीकारणाऱ्यां कलाकार मंडळींनाही सोडलं नाही. ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या `लढा बदलत्या सामाजिक गुन्ह्यांशी` या चर्चासत्रात ते बोलत होते.