www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एकेकाळी तरुणींच्या हृदयाची धडकन असणाऱ्या ऋषी कपूरने ‘अग्निपथ’मध्ये खलनायक रंगवल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र ऋषी कपूरची खलनायकी भूमिकाही तितकीच गाजली. त्यानंतर ‘औरंगजेब’ सिनेमातही ऋषी कपूरने नकारात्मक भूमिका साकारली. आता आगामी `डी डे` मध्ये तर ऋषी कपूर दाऊद इब्राहिमची भूमिका साकारत आहे.
“ट्रिगर खींच, मामला मत खींच” असा डायलॉग मारणारा ऋषी कपूर ‘डी डे’ सिनेमाच्या प्रोमोमध्ये दिसल्यावरच ऋषी कपूर दाऊदची भूमिका साकारत असल्याचं लक्षात आलं. आणि या भूमिकेमध्येही ऋषी कपूर जबरदस्त अभिनय करत असल्याचं दिसून आलं. ही भूमिका दाऊदची असल्याचं कुठेही स्पष्ट उल्लेख केला नसला, तरीही त्याची मिशी, गॉगल आणि बोलण्याची लकब दाऊद इब्राहिमशीच मिळती जुळती आहे.
यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये दाऊद इब्राहिमची व्यक्तिरेखा अप्रत्यक्षपणे दाखवण्यात आली होती. ब्लॅक फ्रायडे सिनेमात दाऊद इब्राहिमची व्यक्तिरेखा त्याच्या नावासकट दिसली होती. आता १९ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या डी डे सिनेमात इरफान खान, हुमा कुरेशी, अर्जुन रामपाल, श्रुती हासन यांच्या भूमिका असल्या तरी त्यासोबत प्रेक्षकांना ऋषी कपूरच्या वेगळ्या भूमिकेची मेजवानी मिळणार आहे. कारण कितीही नाही म्हटलं, तरी ही भूमिका कुणावर बेतलेली आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.