www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संजय दत्तला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का, अशी विचारणा करत मुंबई हायकोर्टानं सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. संजय दत्तला सतत पॅरोल दिलं जातंय, त्याबद्दल जनतेमध्ये संताप आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे.
फक्त पाच हजारांच्या जातमुचलक्यावर संजय दत्तला पॅरोल कशी मंजूर केली जाते. अनेक कैद्यांचे पॅरोलचे अर्ज पडून आहेत, मग संजयच्या बाबतीत असा दुजाभाव का केला जातो, इतरांना का पॅरोल मंजूर केलं जात नाही, असे अनेक कडक सवाल करत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढलेत.
त्याचबरोबर यासंदर्भातला अहवाल एका आठवड्यात देण्याचे आदेशही देण्यात आलेत. तसंच पॅरोल आणि फरलोच्या नियमांत बदल करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिलेत. दरम्यान, हायकोर्टानं फटकारल्यानंतर राज्य सरकारनं याबाबत खुलासा केलाय.
पॅरोलबाबतच्या नियमांत बदल करणार असल्याचं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलंय.अतिरिक्त पॅरोलवर सुट्टी घेतलेल्या कैद्यांना तेवढाच कालावधी पुढे कारागृहात रहावं लागणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, संजय दत्तच्या पॅरोलचा मुद्दा विधीमंडळातही गाजला... या विषयावर आक्रमक होत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरलं... संजयची दिवाळी घरी झाली. ३१ डिसेंबरला न्यू इयर साजरं करायला तो घरीच होता आणि आता प्रिय दत्त यांच्या निवडणुकीसाठीही तो घरी आहे... राज्य सरकारनं याचं उत्तर द्यायला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.