आपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?

सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 24, 2014, 04:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही. सुझानचीही काही वेगळी स्थिती नाही, त्यामुळे पु्न्हा एकत्र येण्यानं कदाचित दोघंही आनंदी होतील आणि आपलं एकत्रित नवं आयुष्य सुरू करतील, अशी आशा त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी व्यक्त केलीय.
सुझानपासून वेगळं होण्याचा धक्का पचवणं हृतिकला तसं कठिणच गेलं. सार्वजनिक ठिकाणी तो हे दाखवत नसला तरी त्याच्या वागण्या-बोलण्यावरून मात्र ते दिसून येत होतं. त्यानं स्वत:ला कामात गढून घेतलं... सार्वजनिक ठिकाणी आपल्या वैयक्तिक आयुष्यात बोलणं टाळलं... कामानंतर आपल्या दोन्ही मुलांमध्ये त्यानं सुझानला शोधण्याचा प्रयत्न केला... या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सलमान खानसहीत इंडस्ट्रीतल्या अनेक मित्र-मैत्रिणींनी त्याला मदत केली... पण, आपलं वैयक्तिक आयुष्य बाजुला ठेवता येत नाही, हेच खरं. तो पुरता कोलमडून गेलेला अनेक जवळच्या लोकांना जाणवतोय. `सुझान माझं प्रेम आहे आण आजीवन माझ्या आयुष्यातलं प्रेम राहील. जर तिच्या चेहऱ्यावर माझ्याविना हसू दिसत असेल तर माझं प्रेम तिच्यासाठी हे जरूर करेल... कोणत्याही अटीविना’ असं म्हणत सोशल वेबसाईटवर हृतिकनं आपल्या मनावरचा ताणही आपल्या चाहत्यांशी शेअर केला होता.
सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी आता ती पुन्हा एकदा आपल्या निर्णयावर शांत मनानं विचार करत असल्याचं समजतंय. तिनंही स्वत:ला सार्वजनिक जीवनातून पुरतं बाद करून टाकलंय. आपल्या बहिणीच्या सिमॉन खानच्या वाढदिवसालाही ती उपस्थित राहिली नव्हती.
यामुळेच, या दोघांना आपापल्या परीनं आधार देण्याचा प्रयत्न त्यांचे दोघांचेही आप्तेष्ठ करत आहेत. दोघं एकमेकांपासून वेगळे राहून आनंदात राहणार नसतील तर दोघांनीही आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी दोघांच्याही आप्तेष्ठांची आणि चाहत्यांचीही इच्छा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.