कराची
आयपीएल स्पर्धा म्हणजे पैशांची लयलूट. संपूर्ण जगातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र पाकिस्तानी खेळाडूना आयपीएलला बंदी घातल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. पण आयपीएलसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंचे प्रेम ओतू जात असल्याचे दिसून येते.
आतापर्यंत मी खेळलेली सर्वोत्तम परदेशी लीग म्हणजे हिंदुस्थानची इंडियन प्रीमियर लीग. हे उद्गार कुणाचे आहेत, हिंदुस्थानचा कट्टर द्वेष करणार्या पाकिस्तानच्या माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचे.
पाकिस्तानचा ३२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आफ्रिदी येत्या १२ ऑगस्टपासून श्रीलंकन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. त्यासंदर्भात बोलताना आफ्रिदी आयपीएलचे गुणगान गायला. आफ्रिदी हा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश व हिंदुस्थान या चार देशांत टी-२० चॅम्पियनशिप खेळला असला तरी ‘आयपीएल’ या हिंदुस्थानातील टी-२० चॅम्पियनशिपचे आयोजन आपणास सर्वोत्तम वाटते, असे आफ्रिदीने स्पष्ट केले.
२००८ सालच्या पहिल्या ‘आयपीएल’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग होता. मात्र पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर हिंदुस्थानातील फ्रँचाईझींनी (संघमालक) पाकिस्तानच्या कोणत्याही खेळाडूला करारबद्ध केले नव्हते. अपवाद फक्त माजी कसोटीपटू अझर मेहमूदचा. या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये अझर खेळला तो पाकिस्तानचा खेळाडू म्हणून नव्हे तर इंग्लंडमधील काऊंटी संघाचा खेळाडू या नात्याने.