www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.
धोनी ब्रिगेडनं वानखेडेवर झालेल्या २०११वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत..तब्बल २८ वर्षांनी दुस-यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची किमया केली... आणि पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप विजेतेपदाच्या आठवणी ताज्या झाल्या...१९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये.
भारतीय टीमने अशी काही दैदिप्यमान कामगिरी केली ज्यामुळे भारतीय फॅन्स बेभान होऊन नाचायला लागले. तर दुसरीकडे दादा टीम्स शॉक लागल्यासारखे स्तब्ध झाल्या होत्या. त्याकाळी सिकंदरासारखी आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारी क्लाईव्ह लॉईडची टीम भारतीय टीमचा घास गिळण्यास सज्ज होती.. मात्र कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय टीमने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ज्या बाणेदारपणे खेळ केला होता. त्याचीच पुनरावृत्ती फायनलमध्ये करत विंडिज टीमचे दात घशात घातले.
प्रथम बॅटिंग करणा-या भारतीय टीमने कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटीलच्या छोत्या पण महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर विंडिजपुढे १८३ रन्सचं टार्गेट ठेवलं... त्यावेळी हे टार्गेट विंडिज टीम सहजी पार करेल अशीच अपेक्षा सर्वांना होती... पण जिद्दीने खेळ करण्यावर अधिकाधिक भर देणाऱ्या भारतीय टीमने सुरूवातीलाच जो धक्का दिला त्यातून कॅरेबियन टीम अखेरपर्यंत सावरली नाही... बलविंदर सिंग संधू हे त्याकाळचे नामांकित भारतीय फास्ट बॉलर... पण इतर आंतरराष्ट्रीय बॉलर्सच्या तुलनेने फारसे प्रभावी नाही.
मात्र संधू यांनी इनस्विंगरवर ग्रीनिज यांच्या बेल्स उडवल्या... आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष साजरा झाला... त्यानंतर राक्षसी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सर विवियन रिचर्डसचा अडथळा दूर केला तो कॅप्टन कपिल देव यांनीच... २८ बॉल्समध्ये ३३ रन्सची खेळी करणाऱ्या रिचर्डसचा अप्रतिम कॅच कपिल देव यांनी मदनलाल यांच्या बॉलिंगवर स्क्वेअर लेगला घेतला आणि आपण विजेतेपद मिळवू शकतो यांवर भारतीय टीमसह फॅन्सचाही विश्वास पक्का झाला.
भारताच्या अचूक बॉलिंगपुढे कॅरेबियन बॅटिंग लाईनअप क्षणाक्षणाला ढेपाळत गेली. अखेर अमरनाथ यांनी मायकल होल्डींगला एलबीडब्ल्यू करत विंडिजच्या इनिंगला अखेरचा खिळा ठोकला... आणि भारताच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड कप जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर कपिल देव यांवी वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली.आणि कोटी भारतीय फॅन्सचा उर भरून आला. त्याच वर्ल्ड कप विजयी क्षणाला २५ जून रोजी तीस वर्ष पूर्ण झाली आहेत... कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या १९८३ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला झी २४ तासचा मानाचा मुजरा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.