क्रिकेटचा `विराट` कोहली तर पाकिस्तान सर्वोत्कृष्ठ टीम

गेल्या वर्षी भारतातर्फे सर्वाधिक रन्सचा टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीला ‘सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर’ म्हणून सन्मानित करण्यात आलंय तर पाकिस्तान क्रिकेट टीम ठरलीय ‘सर्वोत्कृष्ठ टीम’...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2013, 08:56 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गेल्या वर्षी भारतातर्फे सर्वाधिक रन्सचा टप्पा गाठणाऱ्या विराट कोहलीला ‘सिएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इअर’ म्हणून सन्मानित करण्यात आलंय तर पाकिस्तान क्रिकेट टीम ठरलीय ‘सर्वोत्कृष्ठ टीम’...
यावेळी सुनील गावस्कर, कपिल देव, वसीम अक्रम यांच्यासहित भारत आणि पाकिस्तानच्या काही माजी क्रिकेट खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आलंय. पाकिस्तान टीम ही २०११-१२ मधील सर्वोत्कृष्ठ टीम म्हणून निवडली गेली. पाकिस्तानी टीमच्या वतीनं अक्रमनं कपिल देव यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ‘पाकिस्तानच्या टीमच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे’ असं अक्रमनं यावेळी म्हटलंय.
विराट कोहलीसोबतच दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि श्रीलंकेचा कुमार संघकारा हेही या पुरस्कारांच्या शर्यतीमध्ये सहभागी होते. पुरस्कारविजेता कोहली मात्र पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजर नव्हता. यावेळी अक्रमनं कोहलीची जोरदार स्तुती केली तसंच महेंद्रसिंग धोनीऐवजी कॅप्टनपदावर कुणी विराजमान होऊ शकेल तर तो विराट कोहली, असंही त्यानं यावेळी म्हटलंय. ‘तो एक वैशिष्ट्यपूर्ण खेळाडू आहे. उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला अंडर-१९ पासून कॅप्टन्सीसाठी ओळखलं जातंय’, असं अक्रमनं म्हटलंय.

‘आशियाई ब्रॅडमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहीर अब्बास याला जीवनगौरव पुरस्कारानं नावाजलं गेलं. गावस्करला टेस्ट क्रिकेटचा सर्वोत्कृष्ठ फलंदाज तर कपिल देवला सर्वोत्कृष्ठ गोलंदाज म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले. वन डे साठी पाकिस्तानचा माजी कॅप्टन इंझमाम उल हक याला सर्वोत्कृष्ठ फलंदाज आणि अक्रमला सर्वोत्कृष्ठ गोलंदाजीचा पुरस्कार मिळाला.