www.24taas.com, चेन्नई
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हायप्रोफाईल टेस्ट सीरिजला आजपासून चेन्नई टेस्टनं सुरुवात होतेय. दोन्ही देशातील टेस्ट मॅचेस या क्रिकेटप्रेमीसाठी स्पेशल ट्रीट ठरत असतात. ऑस्ट्रेलियात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानं धोनीची टीम मैदानात उतरेल. तर २००४ नंतर भारताला त्यांच्याच देशात पराभूत करण्यासाठी क्लार्क अॅन्ड कंपनी प्रय़त्नशील असेल. दरम्यान, हैदराबाद बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर २ मार्च रोजी होणाऱ्या हैदराबादमधील कसोटी सामन्यासाठी हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतल्यानं दुसऱ्या कसोटी सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन टीम जेव्हा २२ यार्डच्या क्रिकेट पीचवर उतरतात त्यावेळी क्रिकेट मॅचला युद्धाचं स्वरुप प्राप्त होतं. दोन्ही टीमचं विजय हे लक्ष्य असतचं शिवाय मैदानावर खडाजंगीही या दोन्ही टीममध्ये पाहायला मिळते. ऍशेस सीरिजपेक्षा मोठी सीरिज म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजकडे नजीकच्या काळात पाहण्यात येतंय. आता चेन्नईमध्ये या दोन्ही टीम आमने-सामने येणार आहेत. भारत आणि कांगारुंची टीम पाहिली तर दोन्ही टीम्सना बड्या प्लेअर्सची कमी प्रकर्षानं जाणावणार आहे. भारतीय टीममध्ये सचिन तेंडुलकर वगळता अनुभवी क्रिकेटपटू नाही. त्यामुळे अनुभवी प्लेअर्सच्या अनुपस्थितीत दोन्ही टीम्सना विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
भारतासाठी ओपनिंगची जबाबदारी वीरेद्र सेहवागवर असणार आहे. मात्र वीरूबरोबर मुरली विजय, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या तिघांपैकी कोणाला संधी मिळते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीम इंडियाची भिस्त असेल तर हरभजन सिंग, आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा या तिन्ही स्पिनर्सह टीम इंडिया मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ईशांत शर्माबरोबर भुवेश्वकर कुमार फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळेल.
ऑस्ट्रेलियन टीमनं डेव्हिड वॉर्नरसह एड कोवनला ओपनिंगला पाठवणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलंय. मिडल ऑर्डरमध्ये मायकल क्लार्क, शेन वॉटसन आणि मॅथ्यू वेड असेल तर नॅथन लियॉन हा एकमेव स्पिनर्सचा समावेश कांगारुंच्या टीममध्ये करण्यात आलाय. पीटर सीडल, मिचेल स्टार्क आणि जेम्स पॅटिन्सन ही तेज बॉलर्सची फौज भारतीय बॅट्समनना रोखण्यास सज्ज असेल.
भारतासाठी या मॅचमध्ये स्पिनर्स निर्णायक ठरणार आहेत. तर कांगारुंनी फास्ट बॉलर्सवर विश्वास कायम राखलाय. त्यामुळे या मॅचमध्ये भारतीय स्पिनर्स सरस ठरतायत की, ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर्स याकडेच क्रिकेटप्रेमींच लक्ष असेल.