www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता संघात नाही आणि आता या परिस्थितीमधून बाहेर पडून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावंच लागेल, असं धोनीनं म्हटलंय.
आज, टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट मॅच रंगणार आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. भारतीय बॅटसमन ही अग्निपरिक्षाच ठरणार आहे. धोनीनं या टेस्ट मॅचच्या पूर्वसंध्येला खेळाडुंशी संवाद साधलाय. ‘आपण जी शेवटची टेस्ट मॅच खेळलो होतो तेव्हा हे पक्क होतं की सचिन आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय श्रृंखलेसाठी उपलब्ध राहणार नाही. सचिनचं टीममध्ये असणं नेहमीच चांगलं राहीलंय पण आता तो टीममध्ये नाही याचमुळे आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे... आणि आम्ही हे सत्य आता स्वीकारलंय आणि पुढे निघालोत’.
नोव्हेंबर १९९६ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांपैकी कोणत्याही भारतीय बॅटसमनचा टीममध्ये समावेश नाही. भारतानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या दोन्ही श्रृंखलांमध्ये सगळ्याच मॅच गमावल्यात... परंतु घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मॅच मात्र खिशात घातल्यात. यावर धोनी म्हणतो, ‘प्रत्येक श्रृंखला ही एक नवी सुरुवात असते. स्वत:वर ओझं टाकून हाती काहीही लागत नाही. या परिस्थितीत ताळमेळ बसवून टीमच्या गरजेच्या हिशोबानं आपल्याला खेळावं लागणार आहे. टीममध्ये अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांना टेस्ट स्तरावर प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. यासाठीच हीदेखील आपल्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे’.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.