आशिया कप : श्रीलंकेविरुद्ध भारताचा कठिण पेपर

आशिया कपमध्ये टीम इंडियाला शुक्रवारी आव्हान असेल ते बलाढ्य श्रीलंकन टीमचं... दोन्ही टीम्सनं या टूर्नामेंटमध्ये विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे एक `काँटे की टक्कर` क्रिकेटप्रेमींना या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 27, 2014, 08:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, फतुल्लाह
आशिया कपमध्ये टीम इंडियाला शुक्रवारी आव्हान असेल ते बलाढ्य श्रीलंकन टीमचं... दोन्ही टीम्सनं या टूर्नामेंटमध्ये विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे एक `काँटे की टक्कर` क्रिकेटप्रेमींना या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे.
बांग्लादेशला टीम इंडियानं सहा विकेट्सनी पराभूत करत एशिया कपची सुरुवात शानदार केली. या टूर्नामेंटमधील पहिला पेपर हा भारतासाठी अतिशय सोपा होता. आता टीम इंडियाची अग्निपरीक्षा असणार आहे ती श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये...
श्रीलंकेनं पाकिस्तानवर मात करत आपली पहिली मॅच जिंकली होती. दोन्ही टीम्सनी टुर्नामेंटमधील सुरुवात विजयानं केली आहे त्यामुळे हा मुकाबला क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं पहिल्याच मॅचमध्ये आपल्या बॅटचा जलवा दाखवलाय. आता याच मॅचमध्ये त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्माला बांग्लादेशविरुद्ध चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, त्यांना याचं रुपांतर मोठ्या इनिंगमध्ये करता आलं नव्हतं. बॉलर्सनी नेहमीप्रेमाणे निराशाच केली. बांग्लादेशसारख्या दुबळ्या टीमविरुद्ध भारतीय बॉलर्सच्या मर्यादा या स्पष्ट झाल्या. मोहम्मद शमीला चार विकेट्स घेण्यात यश आलं होतं. मात्र, इतर बॉलर्सनी सपशेल निराशा केली होती.
श्रीलंकेची बॉलिंग भारतीय टीमपेक्षा चांगली आहे. लसिथ मलिंगापासून टीम इंडियाच्या बॅट्समनना सावध रहावं लागणार आहे. बॅट्समनच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या मॅचममध्ये बाजी मारली. मात्र, लंकेविरुद्ध बॉलर्सना आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करावीच लागणार आहे. आता टीम इंडिया लंकेवर मात करत आपली विजयी मालिका कायम राखते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.