www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं आज त्याच्या जुन्या दिवसांना उजाळा दिला... ज्यावेळी मोबाईल नव्हते. त्यावेळी सचिन अंजलीला पत्र लिहित होता... आणि जेव्हा त्याला या पत्राचं उत्तर मिळत होतं तेव्हा तो अंजलीच्या सुंदर हस्ताक्षरांतच हरवून जायचा... ही कबुली दिलीय खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं.
सचिनला आपल्या पत्नीसाठी पत्र लिहिण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत असे... तो हसून म्हणतो, `क्रिकेटचा बॉलला फटकावणं माझ्यासाठी नैसर्गिक होतं पण अंजलीला पत्र लिहिताना मात्र मी माझंच पत्र अनेकदा पडताळून पाहायचो की मी काय लिहितोय`.
`त्या दिवसांत मोबाईल नव्हते... त्यामुळे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी केवळ लँडलाईन फोन किंवा पत्रांचा वापर व्हायचा. मी पत्र लिहिणं सुरू केलं. मी सुरुवात केली ती आई-वडिलांना पत्र लिहून... आणि नंतर काही पत्र अंजलीसाठीही लिहिले`
यावेळी, आपल्या आई-वडिलांनी आपल्याला पेन पकडणं आणि लिहिणं कसं शिकवलं होतं, याचीही आठवण त्यानं त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली. `मी जेव्हा कुटुंबापासून दूर राहत होतो तेव्हा मी माझ्या आई-बाबांना आणि नंतर पत्नीसाठी पत्र लिहायला सुरुवात केली होती... तसं पाहिलं तर डॉक्टरांचं हस्ताक्षर वाईट असते पण माझी पत्नी अंजली मात्र याला अपवाद होती. अंजलीचं हस्ताक्षर खुपच सुंदर होतं. त्याला पाहून कुणीही प्रेरीत होऊ शकतं`
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या जीवनाबद्दल बोलताना, `आयुष्य खुपच सुंदर आहे. मला माझ्या मुलांसोबत वेळ मिळतोय. मी आता जास्त खेळत नाही पण कधी कधी माझ्या मुलासोबत खेळतो...` असं सचिननं यावेळी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.