www.24taas.com, नवी दिल्ली
विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरला धडाकेबाज विराट कोहलीमध्ये आपले विक्रम मोडण्याची धमक दिसत असली तरी हा युवा फलंदाज तसे मानायला तयार नाही. ज्या क्रिकेटपटूचा खेळ पाहत मी बॅट धरायला शिकलो, ज्याला मी क्रिकेटचा आदर्श मानतो त्या देवदूताशी माझी तुलना करू नका.
या मास्टर ब्लास्टर फलंदाजाच्या विक्रमांचा पाठलाग करणे म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबल’ आहे, अशी प्रांजळ कबुलीही कोहलीने दिली. कोहली म्हणाला, सचिन तेंडुलकरला माझ्या मनात देवासारखे स्थान असून मी स्वत:ला त्याचा भक्त समजतो. त्यामुळे या महान खेळाडूशी होत असलेली माझी तुलना भूषणावह असली तरी, माझा आदर्श असलेल्या सचिनशी माझी तुलना करू नका. ही तुलना मला कदापि आवडणार नाही.
शंभर शतके बनविणे ही काही सोपी गोष्ट नाही. सचिनच्या विक्रमांचा विचार केला तरी मनावर कमालीचा दबाव वाढतो. त्यामुळे कुठल्याही विक्रमावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मी स्वत:च्या कामगिरीला अधिक महत्त्व देतो, असेही २३ वर्षीय कोहलीने सांगितले.