www.24taas.com, नवी दिल्ली
क्रिकेटमध्ये फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानी बॉलर शोएब अख्तरने केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानची क्रिकेट टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमधील फिक्सिंग ही डोकेदुखी ठरत असताना आणि त्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न चालू असतानाच ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने मात्र क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग करणं ही पाकिस्तानची संस्कृती असल्याचं विधान एका भारतीय टीव्ही वाहिनीवर मुलाखत देताना केलं आहे.
एवढंच म्हणून न थांबता शोएब अख्तरने पाकिस्तानी क्रिकेटर्सची आणखीही पोल खोल केली आहे. मुलींच्या लफड्यांमध्ये आणि त्यांच्या मागे लागण्यामध्येही पाकिस्तानी क्रिकेटर अग्रेसर आहेत, असंही वक्तव्य शोएब अख्तरने केलं आहे. मात्र त्यात काहीच गैर नसून जर १८ व्या वर्षी तुमच्याकडे पैसा, प्रसिद्धी असेल, तर हे घडणं स्वाभाविक आहे असंही शोएब म्हणाला. जर मुली स्वतःहूनच तुमच्या मागे लागत असतील, तर त्यात काय चूक? असं शोएब म्हणाला.
तसंच आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा नसून तो केवळ एक धंदा आहे. आयपीएलच्या नादी लागून तरूण समाधानी होत असतील, तर क्रिकेटचं भविष्य धोक्यात आहे अशी भविष्यवाणीही अख्तरने केली .
फिक्सिंगमुळे कमी वेळात जास्त पैसे मिळतात आणि जास्त चैन करता येते. त्यामुळेच पाकिस्तानमधले क्रिकेटर्स फिक्सिंगच्या नादी लागतात. हे सगळं नवीन नाही, तर पूर्वीपासूनच हे चालू आहे. २००८ साली माझ्याकडे गाडी घ्यायला पैसे नव्हते, तेव्हा मी मित्राकडून पैसे उधार घेतले होते. मात्र बाकीचे क्रिकेटर एवढा संयम न राखता पैशाच्या मागे लागतात आणि त्यामुळेच पाकिस्तानात फिक्सिंग ही संस्कृती बनली आहे. असं शोएब म्हणाला.