www.24taas.com, कोलंबो
यजमान श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी-२० वर्ल्डकपच्या मेगा फायनलचा मुकाबला रंगणार आहे. लोकल फेव्हरिट श्रीलंकन टीमला क्रिकेट पंडितांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. मात्र, टूर्नामेंटची ‘डार्क हॉर्स’ असलेली विंडीज टीम लंकन टीमला धक्का देण्यास सज्ज असेल. ख्रिस गेल या फायनल मॅचमध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्ससाठी की-फॅक्टर ठरणार आहे.
बलाढ्य कांगारुंना सेमीफायनलमध्ये पराभूत करत फायनल गाठणाऱ्या विंडीज टीमच्या ‘गनगम डान्स स्टाईल सेलिब्रेशन’नं साऱ्याच क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. आता श्रीलंकेविरुद्धची टी-20 वर्ल्डकप फायनल जिंकत पुन्हा एकदा विंडीज टीम हा विजयी गनगम डान्स करण्यासाठी आतूर असणार आहेत. वर्ल्डकपमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारी लंकन टीमच फायनलमध्ये विजयासाठी फेव्हरिट आहे. मात्र, टूर्नामेंटमध्ये सरप्राईज पॅकेज ठरणाऱ्या विंडीज टीमला ते कमी लेखण्याची चूक अजिबात करणार नाहीत. ऑलराऊंड कामगिरीच्या जोरावर लंकन टीमनं फायनलमध्ये धडक मारलीय. तर विंडीज टीमनं ख्रिस गेलच्या विस्फोटक बॅटिंगमुळेच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या मॅचमध्येही दोन्ही टीम्ससाठी तोच गेम चेंजरची भूमिका बजावणार आहे. कागदावर लंकन टीम अधिक मजबूत आहे. मात्र, फायनल मॅचमध्ये ज्या टीमचा खेळ सर्वोत्तम असेल तीच टीम बाजी मारणार आहे.
तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकार हे बॅट्समन विंडीजसाठी धोकादायक ठरणार आहेत. तर अजंथा मेंडीस आणि रंगना हेराथची स्पिन बॉलिंग लंकेसाठी निर्णायक ठरणार आहे. टी-२० वर्ल्डकपची फायनल पहिल्यांदाच गाठणारी विंडीज टीम लंकन टीमसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे डॅरेन सॅमीच्या टीमपासून जयवर्धनेच्या टीमला सावध रहावं लागणार आहे.
ख्रिस गेल या जमैकन वादळाला रोखण्याचं आव्हान लंकन टीमसमोर असेल. सेमीफायनलमध्ये त्यानं आपणच टी-२० वर्ल्डकप जिंकू असं जाहीर केलं होतं. तर कायरन पोलार्डनही आपले इरादे ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पष्ट केलं होतं. त्यामुळे त्यालाही झटपट आऊट करण्याचं आव्हान लंकेसमोर असेल. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजची टीम पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ही फायनल मॅच क्रिकेटप्रेमींसाठी सुपर संडेचा सुपर मुकाबला ठरणार हे नक्की.