www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झारखंडच्या सौरभ तिवारीने शुक्रवारी नाबाद १७५ धावांची संस्मरणीय खेळी करीत चॅम्पियन मुंबई क्रिकेट संघाला चांगलेच रडवले. सौरभ तिवारी आयपीएलच्या काही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्यामुळे त्याला वानखेडेच्या खेळपट्टीचा अंदाज होता.
रणजी क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मुंबईने झारखंडचे ४ बळी ९५, तर ८ बळी १८० धावांवर बाद केले होते. मात्र तिवारीने दहावा फलंदाज शंकर रावच्या साथीने नवव्या विकेटसाठी ८२ धावांची अभेद्य भागीदारी रचत मुंबईच्या गोलंदाजांची भंबेरी उडवली. आता झारखंडच्या संघाने पहिल्या दिवसअखेरीस ८ बाद २६२ धावा केल्या आहेत.
झहीर खानच्या अनुपस्थितीत जावेद खान, शार्दुल ठाकूर, विशाल दाभोळकर यांनी छान गोलंदाजी केली. त्यामुळेच झारखंडची अवस्था बिकट होऊन बसली होती. पण सौरभने मुंबईच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. त्याने २६४ चेंडूंत ८ सणसणीत षटकार व १७ चौकारांनिशी नाबाद १७५ धावांची खेळी साकारली.
त्याच्यासोबत शंकर राव ५ धावांवर खेळत आहे. मुंबईकडून जावेदने ६१ धावा देत ४ फलंदाज बाद केले. शार्दुलने ७८ धावा देत २, तर विशालने ५८ धावा देत २ फलंदाज बाद केले. आता सौरभ तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन आणखी किती धावांची भर घालतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी दुसर्या दिवशी झारखंडचे फलंदाज झटपट बाद केल्यास या लढतीत त्यांना झोकात पुनरागमन करता येऊ शकते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.