विराट कोहली ठरला `मॅन ऑफ द मॅच`!

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 22, 2013, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त दिसली. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत. कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये ११९ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ९६ रन्सची खेळी करत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. विराटला जोहान्सबर्ग टेस्टमध्ये `मॅन ऑफ द मॅच`चा खिताब देऊन गौरवण्यात आलंय.
विराट कोहली... टीम इंडियाची रन मशिन... प्रतिस्पर्धी कुठलाही असो कोहलीची बॅट हमखास तळपणार हे समीकरणच बनलं आहे. मात्र, आफ्रिकेविरुद्दच्या वन-डे सीरिजमध्ये त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. तिन्ही वन-डेमध्ये तो सपशेल अपयशी ठरला. मात्र, टेस्ट सीरिजमधील पहिल्याच मॅचमध्ये त्यानं याची कसर भरुन काढली. दोन्ही इनिंगमध्ये त्यानं अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला बाहेर काढलं. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकरनंतर चौथ्या क्रमांकावर टेस्टमध्ये कोण येणार? या प्रश्नाचं उत्तरही साऱ्यांनाच मिळालं. चौथ्या क्रमाकांवर बॅटिंगला येत त्यानं भारतीय टीमचं तारु सावरण्याचं काम केलं. त्याच्या संयमी बॅटिंगमुळेच टीम इंडियाची इनिंग सावरली. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावल्यानंतर त्याला दुसऱ्या इनिंगमध्येही सेंच्युरी ठोकण्याची संधी होती. मात्र, त्याची सेंच्युरी अवघ्या चार रन्सनं हुकली. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाईंटीजमध्ये आऊट होणारा तो भारताचा पाचवा क्रिकेटर ठरला.
चंदू बोर्डे यांनी १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये १०९ आणि ९६ रन्सची खेळी केली होती. मोहिंदर अमरनाथ यांनी १९७७-७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ टेस्टमध्ये ९० आणि १०० रन्स केले होते. सौरव गांगुलीनं २००७-०८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २३९ आणि ९१ रन्सची इनिंग खेळली होती. गौतम गंभीर या टीम इंडियाच्या धडाकेबाज बॅट्समननं इंग्लंडविरुद्ध मोहाली टेस्टध्ये १७९ आणि ९७ रन्सची खेळी केली होती. आणि आता विराट कोहलीनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११९ आणि ९६ रन्स केले आहेत.
विराट कोहलीकडे सचिन तेंडुलकरचा वारसदार म्हणून पाहिलं जातंय. त्यानं आपल्या भन्नाट कामगिरीनं हे वेळोवेळी सिद्धही करून दाखवलंय. त्याचप्रमाणे सचिननंही एका कार्यक्रमात विराट कोहली आपला शंभर सेंच्युरीजचा रेकॉर्ड मोडेल असा विश्वास व्यक्त केला होता. आता आगामी काळातही कोहलीकडून अशाच विराट इनिंग्जची अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.