www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
टीम इंडियाचा तेज तर्रार बॉलर झहिर खाननं टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. आफ्रिकेचा बॅट्समन जॅक कॅलिस त्याचा टेस्टमधील ३०० वा शिकार ठरला आहे. टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय बॉलर ठरला आहे. याआधी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगनं भारताकडून अशा कामगिरी करून दाखवली होती.
झहीर खान... टीम इंडियाच्या बॉलिंगचा प्रमुख आधारस्तंभ... आपल्या स्विंग बॉलिंगनं त्यानं भल्या-भल्या बॅट्समनची दांडी गूल केली. झहीरच्या तेज माऱ्यासमोर क्रिकेटच्या दुनियेतील अव्वल बॅट्समन नतमस्तक होतात. भारतीय टीमनं ज्यावेळी परदेशात टेस्ट मॅचेस जिंकायला सुरुवात केली. त्यामध्ये झहीरचा वाटा मोलाचा आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्येही त्यानं आपल्या बॉलिंगचा जलवा पुन्हा दाखवला. झहिरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जॅक कॅलिसची विकेट घेत टेस्टमध्ये ३०० विकेट्सना गवसणी घातली. टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला.
भारताकडून अनिल कुंबळेनं टेस्टमध्ये सर्वाधिक ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. १३२ टेस्टमध्ये त्यानं ही कामगिरी करून दाखवली आहे. कपिल देव यांनी १३१ टेस्टमध्ये ४३४ विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंगनं १०१ टेस्टमध्ये ४१३ विकेट्स घेतल्या आहेत आणि आता झहिर खाननं ८९ टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेण्याची कमाल केलीय.
दोन्ही बाजूनं बॉल स्विंग करण्यात झहिरचा हातखंडा आहे. त्याचप्रमाणे जुन्या बॉलनं रिव्हर्स स्विंग कऱण्यातही तो तरबेज आहे. सुरुवातीला १४० हून अधिक स्पीडनं तो बॉलिंग कराय़चा. यानंतर त्यानं आपला पेस कमी केला. आणि आपल्या बॉलिंगमध्ये वैविध्यता आणली. आणि याचा फायदा त्याला मोठा झाला. कपिल देव यांच्यानंतर भारताचा सर्वाधिक यशस्वी बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे वसिम अक्रम आणि चामिंडा वास यांच्यानंतर तो सर्वोत्तम लेफ्ट आर्म फास्ट बॉलर आहे. फॉर्म आणि खराब फिटनेसमुळे तो टीमबाहेर होता. आफ्रिका दौ-यात त्याला संधी मिळाली आणि त्यानं याचं सोनं केलं. ४२ दिवस त्यानं फ्रान्समध्ये फिटनेसवर भर दिला. आणि तंदुरुस्त होऊन टीममध्ये पुन्हा स्थान मिळवलं. आता टीममधील स्थान कायम राखण्याचं झहीरसमोर आव्हान असणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.