www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.
दुसऱ्या दिवशी अभ्यंगस्नानाचा थाट, सुगंधाचा घमघमाट, फटाक्यांची गंमत, दिव्यांची संगत, रांगोळ्यांची रंगत आणि गोडधोडाची पंगत. अशा आनंदाची उधळण करीत दिवाळी येते. गुरुवारी साजऱ्या झालेल्या वसुबारसने ‘उठा उठा दिवाळी आली’ची चाहूल लागते. भाऊबीजेपर्यंत पाच दिवस सर्वत्र दिवाळीचा उत्सव असतो.
पहिला दिवस - धनत्रयोदशीचा :
हा दिवस धन्वंतरी जयंतीचा. शुक्रवार, १ नोव्हेंबर आज डॉक्टर, वैद्य मंडळी धन्वंतरीची पूजा करतात. धणे-गुळाचा प्रसाद वाटला जातो. रवी-पुष्य नक्षत्राचा शुभयोग आहे. व्यापारी मंडळींना हिशेबाच्या चोपड्या खरेदी तसेच पूजेसाठी सकाळी १०.२० ते दुपारी १२.०० संध्याकाळी ६.५५ ते रात्री ११.०० ही वेळ शुभ आहे.
दुसरा दिवस - नरक चतुर्दशीचा :
२ नोव्हेंबर. अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी साजरी होते. पाहाटे सूर्योदयाआधी उठून अभ्यंगस्नान करून पायाच्या अंगठ्याने कारिटे फोडावे. पापवासना आणि अहंकाररूपी नरकासुराचा वध करावा असा संदेश हा सण देतो.
तिसरा दिवस - लक्ष्मीपूजन :
३ नोव्हेंबर. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करावे. नवी केरसुणी आणून तिची पूजा करतात. व्यापारी संध्याकाळी मोठ्या थाटात लक्ष्मीपूजन करतात. सायंकाळी ६.०२ ते रात्री ८.३५ या वेळेत लक्ष्मीपूजन करावे.
चौथा दिवस - बलिप्रतिपदा :
४ नोव्हेंबर. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी हिंदूंच्या नव्या संवत्सराचा प्रारंभ होतो म्हणूनच या दिवसाला पाडवा असेही म्हणतात. व्यापाऱ्यांच्या खतावण्यांच्या नव्या वह्या या दिवसांपासून वापरण्याची सुरुवात होते. पाटाभोवती रांगोळी काढून पत्नीने पतीचे औक्षण करावे.
पाचवा दिवस - भाऊबीज :
५ नोव्हेंबर. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्यासाठी खास मिष्टान्नाचे भोजन करते. भाऊही बहिणीला ‘ओवाळणी’ देऊन तिचा सत्कार करतो. बहिणीवर भावाचे प्रेम वाढत राहो असा संदेश देण्याचा हा दिवस.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ