www.24taas.com, नागपूर
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.
वेगवेगळ्या पणत्या, आकाशकंदील, तऱ्हे तऱ्हेच्या भेटवस्तू कैद्यांनी बनवल्या आहेत. बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात कैद्यांनी या वस्तू विक्रीलाही ठेवल्या आहेत. आपण आपल्या घरी दिवाळी साजरी करु शकत नसलो तरी नागपूरकरांना या वस्तूंचा फायदा होईल म्हणून समाधान वाटत असल्याचं कैदी म्हणाले.
कैद्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा वस्तू निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याचं तुरूंग अधिक्षक सांगतात. तर या वस्तू खूप चांगल्या असून त्या बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध असल्याने गृहिणीही खूश आहेत....
वस्तूंच्या विक्रीला सुरूवात केल्यावर दोनच दिवसात या केंद्रानं 34,000 ची कमाई केलीये. त्यामुळे कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुरूंगवास संपल्यावर रोजगाराचा शोध घेणं सोपं जाईल.