मेडिकलमध्ये अपात्र डॉक्टरांची भरती

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील दंतशास्त्र विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या पदभरतीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याची बाब उघडकीस आली आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागात बोगस भरती करण्यात आली.

Updated: Nov 5, 2011, 01:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, अकोला

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील दंतशास्त्र विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या पदभरतीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याची बाब उघडकीस आली आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागात बोगस भरती करण्यात आली. पात्रता व अनुभव नसणार्‍या डॉक्टरांची भरती करण्यात आली आल्याचा आरोप पात्र असूनही डावललेल्या काही डॉक्टरांनी केला आहे.

 

बोगस भरतीबाबत या डॉक्टरांनी जिल्हाधिकारी परिमलसिंह यांच्याकडे तक्रार करून या बोगस भरतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील दंतशास्त्र विभागात दंत चिकित्सक, निवासी दंतरोग तज्ज्ञ आदी पदांसाठी पदभरती करण्यात आली. पदभरती करताना, जाहिरात द्यावी लागते आणि नंतरच पदभरती करता येते. तसेच नियमानुसार या पदभरती करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील डॉक्टरांना प्राधान्य देऊनच पदभरती करण्यात यायला हवी होती आणि पदभरतीबाबतची माहिती प्रत्येक शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना द्यावी लागते. यासाठी एक वर्षाचा अनुभवसुद्धा महत्त्वाचा असतो. परंतु वैद्यकीय महाविद्यालयाने जाणीवपूर्वक कुठल्याही वृत्तपत्रामध्ये जाहिरातही दिली नाही. कुठल्याही शासकीय दंत महाविद्यालयालाला कळविलेसुद्धा नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पात्र डॉक्टरांना पदासाठी अर्ज करता आले नाहीत.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने जाहिरात न काढताच दंत चिकित्सक, निवासी दंतरोग तज्ज्ञ आदी पदांची भरती केली. या भरतीमध्ये पात्र व अनुभव असणार्‍या डॉक्टरांना डावलून अपात्र व अनुभव नसणार्‍या डॉक्टरांची भरती करण्यात आली. ही पदभरती करताना मोठय़ा प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करण्यात आल्याचा आरोप काही डॉक्टरांनी केला आहे.

 

विशेष म्हणजे या भरतीसाठी मुलाखतीला बोलाविण्यात आलेल्या ठराविक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उर्वरित उमेदवारांना मुलाखती न घेताच परतून लावले. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने आधीच पदभरती करण्यासाठी उमेदवारांची निवड करून ठेवली होती, हे सिद्ध होते. असा आरोपही या डॉक्टरांनी केला आहे. २00९ मध्ये अवैधरीत्या नियुक्ती झालेला उमेदवार आजही पदावर कार्यरत आहेत. झालेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात नागपूर येथील एका दंत चिकित्सकाने माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता, दिशाभूल करणारी माहिती त्याला देण्यात आली. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय नियमांना केराची टोपली दाखवित येथील प्रशासनाने बोगस भरती केली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून पुनर्पदभरती करण्यात यावी, अशी मागणीही भरतीपासून वंचित राहिलेल्या डॉक्टरांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.