अकरावी ऑनलाइन प्रवेश, जागांत वाढ

दहावी पास विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी जागांची वाढ कऱण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा तब्बल ७ हजार ६५ जागांची वाढ झाल्याने अकरावीचा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2013, 08:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दहावी पास विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी जागांची वाढ कऱण्यात आली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशात यंदा तब्बल ७ हजार ६५ जागांची वाढ झाल्याने अकरावीचा प्रवेश सुकर होण्याची शक्यता आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेशात समावेश असलेली महाविद्यालये सोडून नव्या महाविद्यालयांना मान्यता दिल्याने यंदा कोट्याव्यतिरिक्त ऑनलाइन प्रवेशातही तब्बल ४ हजारांवर जागा वाढल्या आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत कला शाखेतील जागांत ५४२ जागांची वाढ, तर विज्ञान शाखेत १ हजार ८८१ जागा व वाणिज्य शाखेत १ हजार ६९० जागांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऑनलाइनमधून प्रवेश मिळण्यास विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
यंदा मुंबई विभागीय मंडळातून ३.८१ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. अकरावीसाठी ऑनलाइनसाठी १,५३,४७८ जागा उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकी इनहाऊस कोटा ३६,६६७, अल्पसंख्याक कोट्यात ६८,३०३ , व्यवस्थापन कोट्यात १३,५९४, अशा २.७२ लाख जागा उपलब्ध आहेत.

गेल्या वर्षी एकूण उपलब्ध जागा २ लाख ६४ हजार ९७७ होत्या. यंदा सर्वच कोट्यात ७ हजार ६५ जागांची वाढ झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव होण्यासाठी येत्या २ मेपासून ऑनलाइनचे संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.
http://fyjc.org.in/mumbai या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येतील. तसेच अर्ज कसे भरावे, यासंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ऑनलाइनची माहिती असणारी तसेच कटऑफ मार्गदर्शन पुस्तिकाही शाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.