कामशेतजवळील विद्यावती अनाथ आश्रमातून १२ मुलं गायब झाल्याची आणि मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याची बातमी कळताच येथील संतप्त नागरिकांनी या आश्रमाची तोडफोड केली. या संदर्भातील वृत्त झी २४ तासने प्रथम दिले होते.
आज दुपारी संतप्त जमावाने विद्यावती आश्रमात जाऊन तेथील कार्यालयाची आणि बसची तोडफो़ड केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या भागात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, ही तोडफोड कोणाकडून करण्यात आली, तसेच या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न मावळ पोलिस करीत आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी
कामशेतजवळीव विद्यावती अनाथाश्रमातील ४४ मुलांची आडनावं अचानक बदलून अग्रवाल करण्यात आली होती. त्यानंतर आश्रमातली तब्बल १२ मुलं गायब असल्याची धक्क्दायक माहिती समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
महिला आणि बालकल्याण विभागाला न कळवताच ही मुलं परस्पर दत्तक देण्याचं दाखवण्यात आल होतं. त्याचबरोबर ज्या पालकांनी ही मुलं दत्तक देण्यात आली, त्या पालकांची नावं रजिस्टरमध्ये व्हाईटनरनं खोडल्याचंही उघड झाल होतं. पालकांचे फोन नंबर चक्क खोटे नोंदवण्यात आलेत. याच आश्रमातली १४ वर्षांची मुलगी गरदोर असल्याचंही समोर आलं होतं. ही सगळी धक्कादायक प्रकरणं समोर आल्यावर संस्थाचालक आणि महिला व बालकल्याण अधिका-यांनीही सारवासारव केली होती.
संस्थाचालक आणि महिला व बालकल्याण विभागाच्या संगनमतानं हा सगळा प्रकार द़डपण्याचा आरोप होत होता. त्याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करणा-या समिती सदस्यांना धमकावलंही जातं असल्याचे पुढे आले होते.
या आश्रमातली बारा मुलं गायब झाल्या प्रकरणी आणि १४ वर्षांची मुलगी गरोदर असल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गुंतागुंत वाढत असताना गायब झालेली मुलं कुठं आहेत, हा मोठा प्रश्न आहे.