बॉम्बशोधक पथकाची बोंब!

बईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.

Updated: Nov 30, 2011, 06:30 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. या महत्त्वाच्या विभागाकडं शासनाचं दुर्लक्ष होतंय.

 

बीडीडीएस...म्हणजेच बॉम्ब डिटेक्शन एण्ड डिस्पोसल स्क़ॉड. शहरात कुठेही बॉम्ब असल्याचा कॉल आला की सगळ्यात आधी बीडीडीएस म्हणजेच बॉम्बशोधक पथकाला बोलवलं जातं. आत्तापर्यंत अनेक वेळा जीवावर उदार होऊन या विभागातल्या अधिका-यांनी लाखो मुंबईकरांचे प्राण वाचवलेत. मुंबईसारख्या दहशतवाद्यांचं मुख्य टार्गेट असलेल्या शहरात बॉम्बशोधक पथक हा खरतरं खूप महत्त्वाचा विभाग आहे. मात्र या विभागाचं वास्तव ऐकलतं तर तुम्ही हादरुन जाल. सध्या बीडीडीएसमध्ये केवळ तीन पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. २६/११ हल्ल्यानंतर सरकारनं तातडीनं २४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचं ठरवलं होतं.  मात्र तीन वर्षांनंतंरही या विभागात फक्त ११ अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्यात आलीय. या ११ अधिकाऱ्यांपैकी ८ बीडीडीएसचे अधिकारी सुट्टी, ट्रेनिंग, स्पर्धा या कारणांसाठी बाहेर गेलेले आहेत. मुंबईत बॉम्बच्या अफवांचे दररोज सरासरी २ फोन कॉल येतात. मात्र अपुऱ्या संख्येमुळं हे पथक तातडीनं त्या ठिकाणी पोहोचेल याची काहीच शाश्वती नाही.

 

दहशतवाद्यांचा नेहमी टार्गेट वर असणाऱ्या मुंबईसारख्या शहराच्या सुरक्षेबाबत प्रशासन किती गंभीर आहे हेच या वरून दिसून येतय. दहशतवादी हल्ल्याच्या ३ वर्षांनंतर तरी सरकार याकडं गांभीर्यानं बघणारं का, की बीडीडीएस सक्षम करण्यासाठी पुन्हा एखाद्या दहशतवादी हल्ल्याची वाट पहावी लागणार, हा खरा प्रश्न आहे.