www.24taas.com, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्गजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झालाय. नळदुर्गजवळच्या कुर्टा गावाजवळ एका पुलावरून ही बस २० फूट खाली नदीत कोसळली. या भीषण अपघातात ३२ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
श्री कालेश्वरी ट्रॅव्हल्सची बस नं. KA09 – D45 या बसला हैदराबाद – पुणे मार्गावर हा अपघात झालाय. जखमींना सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. हैदराबादहून ही बस शिर्डीकडे निघाली होती. मात्र, मध्येच या प्रवाशांवर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भीषण होता, की अपघाताच्या ठिकाणी अक्षरशः मृत्युचं तांडव दिसत होतं. अपघातानंतर जखमींना तातडीने सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं.
बस ड्रायव्हरचा निष्काळजीपणा आणि अतिवेगानं गाडी चालवल्यामुळं अपघात झाल्याचं प्रवाशांनी सांगितलं. ड्रायव्हरनं दारू प्यायल्याचा संशय आहे. त्याची वैद्यकीय चाचणी होणारयं. तर समोरून आलेल्या वाहनाच्या प्रखर लाईट्समुळे अपघात झाल्याचं ड्रायव्हरचं म्हणणं आहे. सोलापूरच्या ग्रामीण रूग्णालयात पोलिसांच्या देखरेखीत ड्रायव्हरवर उपचार सुरू आहेत.
मदतीसाठी संपर्क साधा या नंबरवर...
हेल्पलाईन नं – ०२४७२–२२२९००, ०२४७२-२२२७००, ०२१७-२७४४६४६
.