www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...
मुंबईच्या पोर्टबंदरमधून कोलकात्याला निघालेलं श्री जॉय जहाज रत्नागिरीच्या किनारपट्टीलगत भरकटलं होतं. संशयास्पद जहाज आढळल्यानंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्टही घोषित करण्यात आला होता. त्याआधी वसईच्या नायगाव खाडीत हेच जहाज 24 मेला संशयास्पद रितीनं आढळल्यानं खळबळ उडाली होती. आता तुफानी हवामानामुळं समुद्रात हेलकावे खाणा-या या जहाजाचं इंजिन बंद पडलं आणि त्यात या जहाजाचं स्टिअरिंग लॉक झालं... त्यामुळे हे जहाज रत्नागिरीतल्या किना-यावरील खडकाळ भागावर आपटून फुटलं. मात्र या अपघाताला सरकारी यंत्रणाच कारणीभूत असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय. मुळात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी वाहतूक आणि मच्छिमारीसाठी धोकादायक असल्याचं 20 मे लाच सांगत दोन किना-यालगत वाहतुकीसाठी बंदी घातली होती. मात्र प्रत्यक्षात बंदीचा निर्णय असतानाही वसई पोर्टनं या सूचनेकडे लक्ष न देता डिजी शिपिंगला या बार्जची धोकादायक परिस्थितीत वाहतूक करण्याची परवानगी अवघ्या दोन दिवसात दिल्याचं उघड झालंय. रत्नागिरी पोलिसांच्या तपासात ही गंभीर चूक लक्षात आल्यानंतर परिवहन प्रधान सचिवांकडे यासंदर्भात योग्य कारवाई करण्याची शिफारस केलीय. केवळ दोन दिवसात या बार्जला परवानगी कशी मिळाली याचाही पोलीस तपास करतायत.
यापूर्वीही मुंबईतल्या बंदरात दोन जहाजांमधल्या टक्कर प्रकरणात बंदर खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता. तर आता या प्रकरणात बंदर खातं आणि मेरिटाईम बोर्डमधल्या समन्वयाचा अभाव समोर आलाय. त्यामुळं 26/11च्या सागरी हल्ल्यानंतरही समुद्रकिनाऱ्यांची जबाबदारी पेलणारी यंणत्रा अजूनही पोकळ असल्याचं उघड झालंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.