‘अक्षय तृतीया’निमित्त भन्नाट ऑफर्स...

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. कार ते रिटेल बाजार आणि दागिन्यांपासून ते फ्लॅटपर्यंत ऑफर देण्यात आल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 2, 2014, 06:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अक्षय्य तृतीयेनिमित्त खरेदी करण्याची पद्धत पूर्वापार चालत आलीय. ग्राहकांची हिच पारंपारिक मानसिकता ओळखून वेगवेगळ्या ऑफर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात. कार ते रिटेल बाजार आणि दागिन्यांपासून ते फ्लॅटपर्यंत ऑफर देण्यात आल्यात.

सोनं खरेदी…
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... त्यातही विशेष म्हणजे या दिवशी सोने खरेदी खूप महत्त्व आहे. सराफ व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या ऑफर दिल्यात. ‘तनिष्क’तर्फे 10 ग्रँम सोन्याचा शिक्का खरेदी केल्यावर एक ग्रॅमचा शिक्का मोफत मिळणार आहे. ज्वेलरी ब्रँड ‘ओरा’ प्रत्येक 10 ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर अडीच हजारांची सूट देतेय. गीतांजली ज्वेल्स, डायमंड ज्वेलरी ब्रँडच्या 25 हजारांच्या दागिने खरेदीवर एक ग्रॅम सोन्याचा शिक्का मोफत मिळणार आहे. दागिने बनवून घेणाऱ्यांनाही 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
घरं खरेदी…
दागिन्यांबरोबर घर खरेदी करणाऱ्यांसाठीही ऑफर देण्यात आल्यात. ‘ओमकार रिअॅलिटी’च्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये फ्लॅट बुक करणाऱ्यांना 30 ग्रॅमपर्यंतचा सोन्याचा शिक्का मोफत मिळणार आहे. ‘निर्मल लाईफ स्टाईल’च्या प्रत्येक प्रोजेक्टवर एक लाख रुपयांचा कॅश बॅंक ऑफर देण्यात आलीय. ‘टाटा व्हॅल्यू होम्स’च्या फ्लॅटच्या बुकींगवर 10 ग्रॅम सोन्याच्या शिक्का दिला जातोय. जे बिल्डर थेट सूट देत नाहीत त्यांनी स्टॅम्प ड्युटी रजीस्ट्रेशनच्या खर्चासह व्हॅट, सर्व्हीस टॅक्स, आणि एका वर्षाच्या मेंटेनन्सचा खर्च उचललेला दिसतोय तर छोटे बिल्डर नवीन बुकींगवर नॅनो कार फ्री देत आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी...
दागिने खरेदी, फ्लॅट यांच्याशिवाय ग्राहकोपयोगी वस्तूंवरही ऑफर आहेत. काही विक्रेते एअर कंडीशनरच्या खरेदीवर इन्स्टॉलेशनवर 1500 रुपयांची सूट देत आहेत. 220 लिटरच्या खरेदीवर राईस कुकर मोफत दिला जातोय तर एक्सचेंज ऑफरनुसार सॅमसंग 40 इंचाचा 83 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही 64 हजार रुपयांना मिळत आहे. 45 हजार किंमतीचा एचपी लॅपटॉपवर आठ हजारांचा ई-बुक फ्री मिळतोय. ऑनलाईन रिटेलर्स सुद्धा अनेक ऑफर देत आहेत.
कार खरेदी...
ऑटो कंपन्यासुद्धा अक्षय तृतीयेच्या निमित्तानं ग्राहकांसाठी नवीन गाडीच्या खरेदीवर 50 ते 75 हजारांची सुट देताना दिसतायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.