www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीमध्ये छेडछाडीला विरोध करणा-या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर हल्ला करुन भर रस्त्यात त्याची हत्या केली. हल्ला होत असताना अनेक बघे तिथं होते. मात्र त्यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली...
डोंबिवलीच्या विचीवोरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कारण त्यांच्या घरात अवघ्या १७ व्या वर्षीच कर्त्याधर्त्या बनलेल्या संतोषची रोड रोमियोंनी हत्या केलीय. त्याचा दोष एवढाच की त्यानं घराशेजारी राहणा-या मुलीची छेडछाड करणा-यांना जाब विचारला. नवनीत नगरमध्ये राहणारा १७ वर्षांचा संतोष सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरी येत होता. त्याच्यासोबत त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी मुलगी होती. एका बिल्डिंगजवळ पाच जणांच्या टोळक्यानं मुलीवर अश्चिल शेरेबाजी केली. तिचा मोबाईल नंबरही मागितला. संतोषनं त्या पाच जणांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्यामध्ये का पडतोस म्हणून त्या पाच जणांनी त्याला मारहाण करायला सुरूवात केली. एकानं त्याचावर चाकूनं वार केला. संतोषच्या सोसायटीत राहणारे जयंतीलाल गडा भांडण सोडवायला गेले. मात्र त्या टोळक्यानं त्यांच्यावहरही हल्ला केला. संतोष खाली कोसळल्यानंतर पाचही जणांनी तिथून पळ काढला.
दीड वर्षांपूर्वीच संतोषच्या वडिलांचं निधन झालं. ५० वर्षांची आई कॅन्सरशी झुंज देतेय. एक लहान भाऊ आणि बहिण शाळेत शिकतायेत. वडिलांच्या निधनानंतर घराचा सगळा आर्थिक भार संतोषवर होता. त्याच्या निधनानं संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आलंय.
पाचही हल्लेखोर मध्यमवर्गीय कुटुंबातले असून १६ ते १८ वयोगटातले आहेत. त्यापैकी चार जण अल्पवयीन आहेत. संतोष पाल हा १८ वर्षांचा असून १२ मध्ये शिकतोय. दुसरा युवक सतरा वर्षांचा असून बी कॉमच्या पहिल्या वर्षात आहे. इतर दोन १६ वर्षांचे असून त्यांनी शाळा सोडलेली आहे. तर आणखी एक आठवीत शिकतोय. पाचही जणांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. चार अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय.
गेल्या वर्षी २४ ऑक्टोबरला अंधेरीतल्या अंबोलीत छेडछाडीला विरोध करणा-या दोघांची हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आलं तरी अजून त्याची सुनावणीही सुरु झालेली नाही. कायद्याचा धाक नसल्यानंच अशा घटना होतायेत का ? अशा घटना घडताना आजबाजूचे लोक फक्त होणारी घटना उघड्या डोळ्यानं पहात का बसतात ? रोड रोमियोंची मानसिकतना नेमकी असते तरी काय ? असे प्रश्न या निमित्तानं पुढे येत आहेत.
छेडछाड करणा-यांना काय होऊ शकते शिक्षा ?
कलम २९४
गुन्हा - अश्लील कृत्य किंवा अश्लील गाणी म्हणणे
शिक्षा - तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही
कलम ३५४
गुन्हा - महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतून केलेला हल्ला
शिक्षा - ५ ते ७ वर्ष तुरुंगवास आणि दंड
कलम ५०९
गुन्हा - महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतून केलेली अश्लील शेरेबाजी , अश्लील हावभाव किंवा अश्लील कृत्य
शिक्षा - एक वर्षाचा साधा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही