www.24taas.com, मुंबई
युनेस्कोनं जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या यादीत आपल्या पश्चिम घाटाला मानाचं स्थान मिळालंय. जैव विविधतेनं नटलेल्या पश्चिम घाटाला हा बहुमान मिळाल्यानं, तमाम भारतीयांची छाती अभिमानानं भरून आलीये. पण, त्यासोबतच गरज निर्माण झालीये ती पश्चिम घाटाच्या संवर्धनाची. 'बहुमान मिळाला, संवर्धनाचं काय ?' यावर भाष्य...
भारतातल्या पाच राज्यांमध्ये विस्तृतपणे पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, पावसाचं विभाजन करण्याची महत्वाची भूमिका बजावतात. जैव विविधतेची खाण असलेला आणि कुणालाही भुरळ पडावी असं निसर्गसौंदर्य लाभलेला पश्चिम घाट, म्हणूनच आपल्यासाठी खास आहे.
ताजमहल, अजंठा, एलिंफटा, कोणार्क, लाल किल्ला या पाठोपाठ आता पश्चिम घाटही जागतिक वारसा म्हणून ओळखला जाणारय. प्रचंड मोठ्या प्रमाणात जैव-विविधता असलेलं पूर्व हिमालयाप्रमाणे भारतातलं दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे पश्चिम घाट..कुणालाही भुरळ पडावी असाच इथला निसर्ग...चोहोबाजुंनी हिरवाईचा शालू नेसलेली सृष्टी...पाण्याचा खळखळाट, पक्षांची किलबिल....थंडगार हवेची झुळूक येताच शहारून जाणारी रंगीबेरंगी फुलं...अगदी एखाद्या कथा-कादंबरीतलं वर्णन डोळ्यासमोर यावं असंच हे पश्चिम घाटातली दृश्य....भारतातल्या पाच राज्यांमध्ये विस्तृतपणे पसरलेली ही पर्वतरांग पश्चिमेकडील राज्यांमध्ये पावसाचं विभाजन करण्याची महत्वाची भूमिका बजावते.
या घाटाची लांबी 1600 कि.मी असून एकूण क्षेत्रफळ अंदाजे 1 लाख 60 हजार चौ.कि.मी इतकं आहे. देशातल्या 27 टक्के वनस्पती या घाटावर आढळतात. इथं पाच हजारहून जास्त वनस्पती आढळतात. 149 प्राण्यांच्या प्रजाती, 508 पक्षांच्या प्रजाती आणि 189 उभयचर प्राण्यांच्या प्रजातीं हे पश्चिम घाटात दिसून येतात. याशिवाय 334 प्रकारची फुलपाखरं...आणि गोगलगायीसारखे 257 प्रकारचे कीटकही इथं आढळतात.