www.24taas.com, बीड
मृत शिक्षकाच्या पेन्शनच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी लाचेची मागणी या मुख्याध्यापकानं केली आहे. इतकंच नाहीतर या मृत शिक्षकाच्या मुलाकडं त्यानं पार्टीचीही फर्माइश केली. याचा भांडाफोड झी 24 तासवर करण्यात आलं आहे.
मृत शिक्षकाच्या मुलानं स्टिंग ऑपरेशन करुन लाचखोर मुख्याध्यापकाच्या मागण्या छुप्या कॅमे-यात कैद केल्यात. 90 हजार रुपयांचे थकीत पेन्शन मिळवण्यासाठी या मुख्याध्यापकानं याआधीही एकदा पार्टीची मागणी केली होती. त्यावेळी सही मिळवण्यासाठी मृत शिक्षकाच्या मुलानं पार्टी दिली. मात्र पुन्हा एकदा अशाप्रकारची मागणी झाल्यानं त्यानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय.
प्रविण मिटकर या मुलाचे वडिल अंबादास मिटकर हे बीड तालुक्यातील वडवणी या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. 2008 मध्ये निधनानंतर त्यांच्या पेन्शनचे जवळपास 90 हजार रुपये येणे होते. मात्र वडवणीच्या शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास घोडकेंची सही असल्याशिवाय है पैसे मिळणे शक्य नव्हते. हे पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनीही आदेश दिले. मात्र त्यालाही मुख्याध्यापक महाशयांनी केराची टोपली दाखवली. सहीसाठी त्यांनी प्रवीण मिटकर याच्याकडे पार्टीची मागणी केली. आधी एकदा अशाप्रकारे पार्टी दिली होती. मात्र दुस-यांदा पार्टी मागितल्यानं त्यानं हे स्टिंग ऑपरेशन केलंय.
या स्टिंग ऑपरेशन मध्ये आपण पाहू शकता की पार्टी दिल्याशिवाय सही करणार नाही असं हे महाशय सांगत आहेत. प्रविण मिटकर या मुलाने आपल्या वडिलांच्या पेन्शनसाठी या रोहिदास घोडके या मुख्याध्यापकाला याआधीही पार्टी दिली होती. मात्र गेल्या वेळेच्या पार्टीत माझे समाधान झाले नाही असे सांगत पुन्हा पार्टी द्या, मग त्यानंतर पैशांचे बोलू आणि नंतरच सही करणार असा पवित्रा या महाशयांनी घेतलाय. हा सगळा प्रकार छुप्या कँमेराद्वारे या विद्यार्थ्याने टिपला आणि झी 24 तासच्या माध्यमातून या लाचखोर मुख्याध्यापकाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला.