विशेष : जागतिक परिचारिका दिन

आज जागतिक परिचारिका दिन आहे. दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारीका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदुःखाची.

Updated: May 12, 2012, 11:52 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

आज जागतिक परिचारिका दिन आहे.रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचं जीवन कष्टमय, दु:खप्रद आहे. पण अशातही स्वत:च्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. दरवर्षी 6 ते 12 मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो.

 

रूग्णाची सेवा कोण करतं ? असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरआधी नाव येईल ते परिचारिकेचं. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारीका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वताच्या सुखदुःखाची. वैयक्तिक हालअपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रूग्णसेवेत गुंतलेल्या असतात. या रूग्णसेवेला खऱ्या अर्थानं सुरूवात केली ती फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. 12 मे 1820 ला फ्लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सुश्रुषा केली. आणि संपूर्ण जगाला त्यांनी रूग्णसेवेचा पायंडा घालून दिला. यातूनच आपल्यातल्या काही भगिनींना रोजगाराची संधी मिळेल या उद्देशानं 1860 साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना केली. दिवा घेतलेली स्त्री' असंही फ्लॉरेन्स यांच्याबाबतीत म्हटंलं जातं. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झालं. फक्त महाराष्ट्रातच सुमारे अडीच लाखांहून अधिक परिचारिका आहेत. मात्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा केवळ 23 हजार नर्सेसच्याच खांद्यावर आहे. 80 टक्के खासगी रूग्णालयात रूग्णसेवेचं व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रशिक्षित नर्सेस पार पाडतात.

 

बदलत्या काळानुसार या नर्सेसना भेडसावणा-या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. खासगी रूग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्यानं तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावं लागतयं. नर्सेसना कायद्याचं सरंक्षण अद्याप नाही. नोंदणीकृत अहर्ता नसल्यानं त्यांना इतरांप्रमाणे मान-सन्मान मिळत नाही. कामाच्या ठिकाणी डॉक्टर, कपांऊंडर, कधी कधी रूग्णांकडूनही शाररिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. याशिवाय ग्रामीण भागात त्यांच्यावर लसीकरण, प्रसुती, कुटुंबकल्याण यासारख्या कामांचा बोजा टाकला जातो. एकूणच रूग्णसेवेला सुखापेक्षा दुखाची झालर अधिक आहे. असं असतांनाही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे परिचारिका आपली भूमिका बजावत आहेत. स्वत:चं दु:ख विसरून रूग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालणाऱ्या या परिचारिकांचा झी 24 तासचा सलाम.