श्वेता जोशी, www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या काही शाळा कोचिंग क्लास लावून घेण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. खासगी क्लास चालवणाऱ्या विक्रोळीतल्या एका शाळेच्या कोचिंगच्या धंद्याचा झी २४ तासनं पर्दाफाश केला आहे.
विक्रोळीतल्या सरस्वती विद्या निकेतन या शाळेची विद्यार्थिनीच्या दप्तरात इंग्रजी विषयांच्या दोन वह्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातली एक वही शाळेची तर दुसरी शाळेच्याच खाजगी क्लासची असते. पैसा उकळण्यासाठी शाळांनी आता खाजगी क्लासेसचा धंदा सुरु केला आहे. मुंबईत एक दोन नव्हे तर डझनावरी शाळांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. विद्यादीप विद्यालय या शाळेने शाळेचं क्लासेसमध्ये रुपांतर केलं आणि विद्यार्थ्यांना या क्लासेसना बसायची बळजबरी केली जाते असा आरोप पालकांनी केलं आहे.
शाळेतील खाजगी क्लासेसची चौकशी करायला झी २४ तासची टीम सरस्वती विद्या निकेतनच्या पहिलीच्या वर्गात गेले. शाळेतील क्लासेसला कोण कोण जातं असं विचारलं असता संपूर्ण वर्गाने हात वर केला. याच सरस्वती शाळेत जाब विचारायला गेलं असता, कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी विविध कारणांनी पलायनच केलं होतं. तर, विद्यादीप विद्यालयांनी क्लासेस बंद केलं असं कबुल केलं.