www.24taas.comमुंबई
मुंबई गणरायाच्या स्वागतासाठी झगमगू लागलीय. बाप्पाच्या सरबराईत काहीही कमी पडू नये, यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशाला सजवण्यासाठी सध्या गिरगावातल्या वेदकांच्या कार्यशाळेत सोन्या चांदीचे सुंदर दागिने घडवले जातायत.
ही लगबग सुरू आहे गणरायाच्या सरबराईसाठी. मुंबईतली तमाम गणेश मंडळं गणेशोत्सवाच्या तयारीसाठी झटतायत. गणरायाच्या साज शृंगारासाठी सोन्या-चांदीचे, रुप्या-मोत्यांचे सुंदर दागिने घडवले जातायत. सोन पावलं, सोनपट्ट्या, बाजूबंद, मुकुट, पर्शुकडे, कानातली फुलं..असे सगळे दागिने बाप्पाला नटवायला तयार झालेत.
गिरगावातल्या नाना वेदक यांच्या कार्यशाळेत सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर कारागिर रात्रंदिवस मेहनत घेतायत. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असली तरी बाप्पाच्या मुर्तीला नटवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांकडून दागिन्यांची मागणी कमी झालेली नाही. आत्तापर्यंत नाना वेदक यांनी 6 किलो सोनं आणि 40 किलो चांदीचे दागिने बनवले आहेत.
सोनपावलांच्या एका जोडीसाठी 10 किलो चांदी आणि 200 ग्राम सोनं वापरण्यात आलंय. त्याची किंमत आहे12 लाख रुपये. तर गणरायाच्या सोनपट्ट्यासाठी 200 ग्राम सोनं वापरलं गेलंय. त्याची किंमत आहे 6 लाख...बाजूबंदांसाठी 1 किलो चांदीचा वापर झालाय. 1 लाखाला हा बाजूबंद आहे. 3 किलो चांदीनं हा मुकुट सजलाय. त्याची किंमत आहे अडीच लाख. 300 ग्रॅम चांदी असलेलं चक्र 30 हजारांना आहे. तर एक किलो चांदीचं कडं एक लाखांना आहे. तरीही हे सगळं जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसवायचं असेल तर तुमच्याकडे अनेक पर्याय असल्याचंही कारागिर सांगतात.
एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गणपतीबाप्पा भक्तांच्या भेटीला येतायत. त्याच्या तयारीत कुठलीच कसर राहणार नाही,याची काळजी घेतली जातेय.