गणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त

मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. तलाव, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी लाईफ गार्ड तैनात कण्यात आले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2012, 08:24 AM IST

www.24taas.com,मुंबई/पुणे
मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. तलाव, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी लाईफ गार्ड तैनात कण्यात आले आहेत.
मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. इथं गणेशभक्त मोठ्या संख्येनं येत असतात. मात्र त्यांना भरती आणि ओहोटीबाबत विशेष माहिती नसते. त्यामुळं अनेकजण बुडाल्याच्या घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी लाईफ गार्ड असोसिएशन मंडळानं गणेशभक्तांसाठी खास सोय केलीय.
बीपीटी जल सुरक्षादल आणि मुंबई जलसुरक्षा दल मुंबईकरांच्या संरक्षणासाठी चौपाटीवर तैनात करण्यात येणार आहेत. यांत १००० लाईफ गार्ड, २०० स्वंयसेवक, जलरक्षक आणि स्कूबा डायव्हरचा समावेश आहे.. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आणि जुहू चौपाटीवर ते गणेशभक्तांवर खास लक्ष ठेवणार आहेत.
पुण्यात गणेशोत्सवासाठी तब्बल पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. पुण्यात गणेशोत्सवाची आगळीवेगळी धूम असते.मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्घतीनं साजरा होणारा पुण्यातल्या गणेशोत्वाची खासियत निराळी आहे.
पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात भक्तीसागराला जणू उधाण आलेलं असतं. मात्र पुण्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या साखळी स्फोटांच्या यंदा विशेष खबरदारीचे उपाययोजना करण्यात आल्यात.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्सवा दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांची करडी नजर असणार आहे.. तब्बल १५०० सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही लावण्याबाबत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि सामाजिक संस्थांनीदेखील पुढाकार घेतलाय.
दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीत प्राण्यांचा वापर करण्यावरही काही निर्बंध घालण्यात आलेत. तसंच गणेशोत्सवात शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आलीय. शिवाय विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर पारंपरिक वाद्यच वाजवता येणार आहेत.