लालबाग राजा : महिला कार्यकर्तीकडून महिला पोलिसाला मारहाण

पोलिसांना मारहाण केल्यानं एका कार्यकर्त्याला अटक झाल्या ‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा याच मंडळातील एका कार्यकर्त्या महिलेनं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 17, 2013, 03:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलिसांना मारहाण केल्यानं एका कार्यकर्त्याला अटक झाल्या ‘लालबागचा राजा’ मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरुच आहे. आता पुन्हा एकदा याच मंडळातील एका कार्यकर्त्या महिलेनं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचं समोर आलंय.
मारहाण करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्या महिलेचं नाव प्रियांका धुरी आहे. कविता पाळेकर या महिला पोलीस लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असताना ही घटना घडलीय. सोमवारी सायंकाळी चार वाजल्याच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या कविता यांना प्रियांका धुरी यांच्याकडून मारहाण करण्यात आलीय.
लालबागच्या राजाच्या स्टेजजवळ उभ्या असलेल्या प्रियांका धुरी या कार्यकर्त्या महिलेनं सामान्य भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या असतानाही अवैधरित्या अनेक लोकांना दर्शनासाठी सोडत होती. हे लक्षात आल्यानंतर कविता यांनी प्रियांका हिला समज दिली. तरीही प्रियांकानं पोलिसांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून आपला हेका कायम ठेवला.
तेव्हा कविता यांनी प्रियांकाला ‘रांग मोडून लोकांना आत पाठवल तर कारवाई करण्याची’ वॉर्निंग दिली. यामुळे संतापलेल्या प्रियांकानं ड्युटीवर असलेल्या कविता यांची कॉलर पकडली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत कविता यांच्या गळ्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत.

त्यानंतर कविता यांनी काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये घाव घेतली. पोलिसांनी प्रियांकाला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पण कविता पाळेकर तक्रार नोंदविण्यासाठी अडून राहिल्या तरिही काळाचौकी पोलीस चौकीतील वरीष्ठ पोलीस अधिकारी भाऊसाहेब गिते यांनी कविताला दाद दिली नाही आणि कविता यांचा फक्त जबाब नोंदवून घेतलाय. यासंदर्भात कविता यांचे वडील गोविंद पाळेकर यांनीही संताप व्यक्त केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.