www.24taas.com झी मीडिया, कोल्हापूर
गणपतीचे आगमन आता आवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादाच निमित्त ठरलंय ते म्हणजे डॉल्बी...
ध्वनीप्रदूषणामुळे कोणावर कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ७० ते ८० डेसिबल इतक्याच आवाजात ध्वनीक्षेपकं लावावीत असं कोल्हापूर जिल्हा प्रशासनांन सुचवलं आहे. मात्र यावर काही मंडळांनी आक्षेप घेतलायं. सार्वजनिक गणेश मंडळांनी ८० ते १२० डेसिबल इतक्या आवाजात ध्वनीक्षेपक लावणार असे सांगितले आहे. पण कोणी कायद्याचं उल्लंघन केल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलीस प्रशासनानं सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बी लावण्यावर ठाम आहेत. पोलिसही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. मात्र यातून सुवर्णमध्य निघावा आणि उत्सव निर्विघ्न पार पडावा, असं साकडं कोल्हापूरकर बाप्पाला घालतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.