www.24taas.com, झी मीडिया, काठमांडू
नेपाळचे नवे पंतप्रधान सुशील कोईराला यांची संपत्ती आम आदमी सारखीच आहे. एखाद्या पंतप्रधानांची संपत्ती किती असेल, असा प्रश्न विचारला तर शालेय विद्यार्थीही कोट्यवधींची असे उत्तर अगदी सहज देतील. मात्र, नेपाळच्या नव्या पंतप्रधानांबाबत हे उत्तर बरोबर ठरणार नाही.
कारण, त्यांची एकूण संपत्ती आहे केवळ दोन मोबाईल फोन. साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले नेपाळचे नवे पंतप्रधान सुशील कोईराला यांच्याकडे दोन मोबाईल सोडले, तर अन्य कुठलीही संपत्ती नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या संपत्तीचे विवरण काय लिहावे, असा पेच अधिकार्यांसमोर निर्माण झाला आहे.
कोईराला यांचे प्रमुख सचिव वसंत गौतम म्हणाले की, कोईराला यांच्याकडे घर किंवा जमीन अशी अचल संपत्ती नाही. त्यांची कोणत्या कंपनीत गुंतवणूकही नाही. त्यांच्याकडे दुचाकीसुद्धा नाही. एवढेच नाही तर त्यांनी अद्याप बँकेत खातेही उघडलेले नाही. ७५ वर्षीय कोईरालांकडे सोने किंवा चांदीच्या वस्तूही नाहीत, असेही ते म्हणाले.
गौतम म्हणाले की, मोबाईल फोनचा संपत्ती म्हणून उल्लेख करता येत नाही. त्यामुळे संपत्तीचे विवरणपत्र कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे. कोणत्याही संपत्तीचा उल्लेख न करताच हे विवरण द्यावे लागेल. यामध्ये केवळ त्यांची वैयक्तिक माहिती भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.