फाटाफुटीला उधाण, अजित पवारांना गावितांचा झटका

निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसं सर्वच पक्षांमध्ये फाटाफुटीला उधाण आलंय. शिवसेनेचे खंदे नेते राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादीनं फोडल्यानंतर काल महायुतीतल्या भाजपनं त्याचा बदला घेत राष्ट्रवादीचे भिवंडी शहर अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये घेतलं. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना, यांना भाजप तिकिट देण्याची शक्यता असताना विजयकुमार गावित यांनीही फुटीचे स्पष्ट संकेत दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 19, 2014, 10:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसं सर्वच पक्षांमध्ये फाटाफुटीला उधाण आलंय. शिवसेनेचे खंदे नेते राहुल नार्वेकरांना राष्ट्रवादीनं फोडल्यानंतर काल महायुतीतल्या भाजपनं त्याचा बदला घेत राष्ट्रवादीचे भिवंडी शहर अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये घेतलं. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना, यांना भाजप तिकिट देण्याची शक्यता असताना विजयकुमार गावित यांनीही फुटीचे स्पष्ट संकेत दिलेत.
अजून किती वर्ष डोक्यावर ओझं घ्यायचं, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेस खासदार माणिकराव गावितांवर तोफ डागलीय. स्वतःला `टॉप टेन` खासदार संबोधणारे केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, जनतेला ते नको आहेत. आणि याच कारणासाठी हीना गावित यांच्या उमेदवारीचा विषय पुढे आला असल्याचा दावा त्यांनी केलाय.
जिल्ह्याचे पालकमंत्री पद्माकर वळवी यांनीही उमेदवार बदलण्याची मागणी पक्षाच्या बैठकीत केल्याचा खळबळजनक दावा डॉ. गावितांनी केलाय. त्यामुळे विजयकुमार गावितांनी अशा पद्धतीने टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची तयारी केल्याचे संकेत दिलेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय. पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानं भाजपची भिवंडी मतदारसंघातली ताकद वाढल्याचं मानलं जातंय.
कपिल पाटील यांनीही मोदींचा लाट असल्याचं सांगत आपल्याला भिवंडीचा विकास करायचा असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलंय. कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, काकाला पुतणे त्रास देतात, मुलगी त्रास देत नाही, असा टोला भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना लगावला. हीना गावित आणि विजयकुमार गावितांवर राष्ट्रवादी काँग्रेस दबाव टाकत असल्याची टीका गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावितांना तंबी दिली होती. मुलगी भाजपमध्ये प्रवेश करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. गावितांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात येईल तसेच पक्षातून हकालपट्टी करण्याचा इशारा दिला होता. त्यावर मुंडेनी टीका केली असताना गावितांनी बंडाचे निशाण फडकावलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.