www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. एका पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आज अण्णा आणि ममता दीदी एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले.
`ममता बॅनर्जी या एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी जनहिताच्या उद्देशानं आपण पाठविलेल्या पत्राला उत्तर दिलं...` असं अण्णांनी यावेळी म्हटलं. ममता दीदींनी सत्तेत आल्यास जनलोकपालमधले १७ मुद्दे मंजूर करण्याचं आश्वासन आपल्याला दिल्याचंही अण्णांनी यावेळी सांगितलंय.
ममता दीदींच्या कामाचा उल्लेख करत, देशाच्या सरकारनं सध्या जनतेची लूट करण्याची सध्याची टॅक्सनीती अवलंबविली आहे... मात्र, ममता दीदी समाज, देशाच्या हिताचा विचार करतात, असंही अण्णांनी म्हटलंय.
याचवेळी अण्णांनी आपण भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी किंवा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कधीही पाठिंबा देणार नसल्याचंही अण्णांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.