काँग्रेस पक्षात पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी शरद पवार यांना भेटून ही ऑफर दिली आहे.

Updated: Jun 22, 2014, 12:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी सुरू असलेल्या सुंदोपसुदीच्या दरम्यान, राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी सुनामी येण्याची शक्यता आहे. कारण अशी काही खलबतं दिल्लीत सुरू असल्याचं सांगण्यात येतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर काँग्रेसने मोठ्या हिंमतीने, राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा मुद्दा ठेवला आहे.
यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर एक ऑफर ठेवलीय, ती म्हणजे काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी विलीन करा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करा.
सोनियांचे निकटवर्ती पवारांनी भेटले
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल आणि ए.के.अॅण्टोनी यांनी शरद पवार यांना भेटून ही ऑफर दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभव स्वीकारावा लागल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीला ही ऑफर दिल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राजकीय मोहिम उभी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र शरद पवारांनी काँग्रेसच्या या ऑफरवर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.
काय झालं त्या परदेशी मुद्याचं
यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा परदेशी असण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली होती, आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती.
मात्र शरद पवार यांच्याशी पक्ष विलीनिकरणासाठी झालेल्या चर्चेत या ज्येष्ठ नेत्यांनी पवारांनाचं सांगितलंय, आता या मुद्यात दम नाही, तुम्ही परत काँग्रेसवासी झालं पाहिजे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.